Saturday, February 23, 2008

प्रेमपत्र असेही !(भाग :द्वितीय)

अमावस्येच्या आधीची ती अंधारलेली रात्र .रातकिडयांचा तो धीर गंभीर आवाज .रिटायर्ड पेन्शनराच्या खुर्चीसारखी
दारा खिडक्यांच्या तावदानांची खडखड. अश्यांत अचानक कुठुनसे एक वटवाघूळ टग्या भाऊंच्या घरात आले अन उश्याशी पत्र ठेवून उडून गेले. ‘कुणाचे हे पत्र?’ म्हणून टग्याभाऊंनी आपला जाड भिंगाचा चष्मा सरसावला अन पत्र वाचायला घेतले.

“ हे प्राणप्रिया प्राणेश्वरा !
तुझे पत्र मिळाले. आणि तुझ्या कौतुकरूपी स्तुती सुमनांच्या बाथ टब मधल्या मंद धुंद वर्षावानं मी बह्रून गेल्ये.
तुझे ते राजबिंडे रूप मला (?) स्मरले अन सख्या हे पत्र मी लिहायला घेतले.

हे प्राणसख्या ,
आठवतोस मला तू जिन्स अन टि-शर्ट मधला,

किती रे सुंदर तुझे हे रूपडे ,
कपाटातल्या हॅंगरलाच जणू टांगलेत कपडे ! ॥१॥

जगा या दिसतो प्रथम दर्शनी , तुझ्या काळ्याभोर केसांचा ‘ शाहीद’ स्टाईल केशसंभार ,
पण फक्त मलाच आहे माहीत लाभलाय त्यांस ‘डाबर केशकाला’चाच हातभार ॥२॥

भिंगाचा चष्मा का असेना तुला ,
द्रुष्टी आहे तुझी अतीव सुंदर ,
मी मात्र कोडयांत पडते ,
कसं गडया पाहू शकतोस तू एकाच वेळी उर्ध्व आणि अधर ! ॥३॥

किती रे राजा हात तुझे बारीक ,
सहारच्या वाळवंटात जणू कोणी वाळवलीय खारीक ! ।।४॥

कळेना मला का फिरायचास माझ्याभोवती ,जसा बत्ताशाला लागतो मुंगळा ,
अरे मेल्या ! तू तर दिसतोस … प्रयोगशाळेतला हाडांचा सापळा ! ॥५॥

आवाज रे तुझा अगदी इंटरेस्टींग ,
ऎकतांना वाटे … फिट करतांनाच साऊंड तुझ्यात,
विधात्याकडनं त्या, तुटली होती का रे स्प्रिंग ?॥‍६॥

आठवते का सख्या तुला ?
रूप पाहून तुझे असे हे डॅशींग ,
(भूत की काय म्हणून)
धाकावली होती म्हैस आमची ,
मारले होते तिने शिंग ! ।।७॥

सदरे रे तुझे ते किती असतात मळके ,
धड दात नाही की नाही पुरेसा क्लीअरंस कवळीला ,
तोंडाचे या झाल्येय की रे बोळके ! ॥८॥

येताच तू येई तो मंद सा अजब वास ,
विचारावेसे बऱ्याचदा वाटले मला,
सगळ्या डिऒड्रंट बनवणाऱ्यांनी अन विकणाऱ्यांनी घेतलाय की काय रे गळफास ? ॥९॥

माझ्यावरच्या प्रेमामुळे म्हणतोस ,
देह झालाय जर्जर ,
पण मला आठवतो आपला संसार ,
मी नवी कोरी सायकल अन तू टायर पंक्चर ! ॥१०॥
बोलणे रे ,तुझे किती होते फाकडे ,
भिती वाटे ,गडया मला ,कुणी फूंकर मारली तर ,उडून पडशील कुणीकडे ! ॥११॥

वाचूनी तुझा शब्द न शब्द ,रडले रे मी ढसा ढसा ,
कोमलह्रुदयी या पुष्पाला दुखवुनी , तू ‘बापडा’ कसा ? ॥१२॥

पण असा जरी असलास ना सख्या तू ,
तरी आहेस मला प्रिय,
देवाघरी जातांना काय ईच्छीले मी ,
तुला ठाऊक आहे काय ? ॥१३॥

“ देवा ! पुढल्या जन्मी ‘वडापाव’ च्या दिवशी ,
माझ्याकडनं पाच ऐवजी दहा आंबे घे ,
पण ह्येच ब्येणं मला ( बदला घेण्यासाठी ) ,
पुढल्या जन्मीही लाभू दे ! ॥१४॥

तुझीच आहे सख्या ,मला रे चिंता ,
अन अजब ही हूरहूर माझ्या मनी …,
वाट पाहात्ये अमावस्येची ,कधी रे येशील भूतयोनीत ? ॥१५॥

या जगांत नसूनही केवळ तुझीच असलेली ,
टवळी.



(पराग खैरनार,नाशिक )
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/
तुझे ते राजबिंडे रुप मला (?) स्मरले अन सख्या ,हे पत्र मी लिहायला घेतले.

No comments: