Saturday, February 23, 2008

ट्रिंग ट्रिंगबोला बोला !(हास्य लघू नाटीका )

(दि दि दरिद्री वाहीनीचा स्टुडीओ. ‘हॅलो दु:खी’ या कार्यक्रमाचा रंगमंच ! )
निवेदीका : “नमस्कार ! दि दि दरिद्री वाहीनीच्या ‘हॅलो दु:खी’ या कार्यक्रमात आपले स्वागत !
अनेक मान्यवर आजपर्यंत इथे येऊन गेले आहेत.आजच्या प्रमुख पाहूण्यांची थोडक्यांत ओळख करून देते .
(दुसऱ्या खुर्चीवर बसलेल्या स्त्रीला…) नमस्कार !”
(लगेच कॅमेरा त्या स्त्री…)
स्त्री: ” नमस्कार !”
निवेदीका : या आहेत सौ.भूमितीबाई समीकरणे .दर्शकहो,आपल्याला नांवावरनंच कळलं असेल की यांचे क्षेत्र ‘गणित ’ या विषयाशी संबंधीत आहे. महाविदयालयांमधून त्या गणित हा विषय शिकवतात. त्यांनी बरीच उपयुक्त पुस्तकं लिहीली आहेत.
पुस्तकांची नावं जरा एकता कपूरच्या सिरियल सारखी वाटतील ती खालीलप्रमाणे:
आर्यभट्ट : शून्याचा शोध ,मग एकाचा,मग दोनाचा ,सहस्त्रकापर्यंत!,
कुठल्याही गणिताविना वीजेचे बील कसे कमी कराल ? : कारणे व उपाय ,
हसता खेळता ,नाचता कुदता मोबाईल वर बोलता बोलता शिका गणित !
२१व्या शतकाच्या उंबरठयावर ,पाणी काढूया लाथ मारून ,गणितीय समीकरणांच्या कंबरडयावर !
एक्केचाळीसातून चाळीस गेले मग उरलेल्या एकाचे काय झाले त्याची कथा !
हं ! तर आपण प्रश्नं विचारायला सुरूवात करूया. आप लेही काही प्रश्नं असल्यास आम्हाला ०९९-९९९९९९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता .इथे एक विनंती करते. कॉईन बॉ़क्स वरनं फोन लागणार नाही .क्रुपया,एस टी डी वरनं प्रयत्न करावा. …. तर भूमितीबाई पहीला प्रश्नं विचारते.आपल्या नावानंच सुरुवात करु.आपलं ‘ भूमिती’ हे नाव कसं पडलं ? ”
भूमितीबाई: “त्याचं असं झालं की म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मी लहान असतांना पाळण्यांत खूप रडायचे ,असं आई- बाबा सांगतात .त्यामुळे ते मला जमीनीवरंच ठेवत .तिथेही मी सरळ अशी कधी झोपलेच नाही .तर वेगवेगळ्या कोनांमध्ये मी झोपायचे .ते कोन म्हणजे निरनिराळ्या भौमितीक रचना होत म्हणुन माझं नाव ‘भूमिती’ ठेवलं गेलं. ”
निवेदीका : “ओहो !फारच मनोरंजक आहे ही तुमच्या नावाची कहाणी !”
(टेलीफोनची घंटी वाजते.. ट्रिंग ट्रिंग!)
निवेदीका : “आपला पहीला फोन वाटतं !”
(फोनवर): “ हॅलो दु:खी ! बोला ! हां ! हां! बोला !
फोनवरून पलीकडचा माणूस: “ आरं ये गणप्या ! हायेस कुठे ल्येका तू ? इक्डं म्हशीचा शेण साफ करायचाय ,चारा घालायचाय ! कुठे हाय तू ?”
निवेदीका :”अहो तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोन केलात !रॉंग नंबर!”
पलीकडचा माणूस: :“ओ बाई ! गणप्याला पाठवा आमच्या , अन आम्हाला काही रांगेत नंबर नै लावायचा .
हा म्हादबा बोलू राहयलो.”
निवेदीका : “मी फोन ठेवत्येय , क्षमस्व!”
(फोन ठेवते)
निवेदीका :”दर्शकहो माफ करा .नावाप्रमाणं आमची वाहीनीही दरिद्री असल्यानं असे फोन येतात. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळू या .तर भूमितीबाई मला सांगा की … गणिताची आवड आपल्याला कशी निर्माण झाली?”
( सौ.समीकरणे मूव्हींग चेअरवरून हातांची बोटं एकमेकांत गुंतवून ० ते १२० अंशांमध्ये डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे अशा फिरत्या अवस्थेत.. )
सौ.समीकरणे : “फार चांगला प्रश्न विचारलात !”
निवेदीका :“ हो पण उत्तर द्य़ा आता लवकर !”
सौ.समीकरणे : “त्याचं काय झालं की मी पाचवीत असतांनाची गोष्टं. . . दूधवाला आमचा ! वेळेवर येईना ! सुट्ट्या मारायला लागला. कधी कधी दूध पातळ असायचे .मी कालनिर्णयावर या सर्वांची नोंद करीत असे.तेव्हापासूनच गणित हा विषय माझा आवडता झाला.”
निवेदीका : “म्हणजे एखादे दिवशी तो नाही आला की त्या तारखेला तुम्ही क्रॉस करून ठेवत असणार .बरोबर ना ?”
सौ.समीकरणे : “चूक !तसं बिलकुल नाहीये .काय होत होतं की माझे वडील गिरणी कामगार .त्यांना कही तरी स्टिम्युलंट हवंच असायचं.अन चहा नाही मिळाला तर बिडया ओढायचे भसा -भसा.आमचं चाळीतलं एका खोलीचं घर मग काही दिसायचं नाही .मग मी क्रॉस करून ठेवायचे ‘आज अभ्यास झाला नाही म्हणून ..” .
निवेदीका : “वावा ,खरंच ! किती हो तुम्ही हुशार ! (तेवढयांत फोन वाजला.) हं आपला दूसरा फोन वाटतं .नाशिकहून श्री.कडमडकर बोलतायत .हां ,हॅलो दु:खी ! बोला.”
फोनवरून पलीकडचा माणूस: “ हलू.”
निवेदीका :“हां .बोला .आपला काय प्रश्न आहे ? ”
पुन्हा ,पलीकडचा माणूस: “ हलू ”
निवेदीका : “ अहो,इथून न हलण्याचेच पैसे निर्माताआम्हाला देत असतो.तुम्ही नि:संकोच विचारा.मी अजीबात हलणार नाही. श्री.कडमडकर लवकर कडमडा … आपलं बोला .मला कार्यक्रम पुढे रेटायचाय ..आमच्या वाहीनीचा टी.आर.पी.वाढवायचाय !”
(फोनवरून ) पलीकडचा: मला सांगा ,वीजेच्या बीलावरचं पुस्तक तुम्ही कसं लिहीलं ?”
सौ.समीकरणे : “कसं म्हणजे ? हातानं लिहीलं.
(फोनवरून ) पलीकडचा: “तसं नाही हो पण कसं लिहीलं ?”
सौ.समीकरणे : “शाईचा वापर करून कागदावर लिहीलं .”
(फोनवरून ) पलीकडचा: “ही बाई माझं बील वाढवणार फोनचं …अहो..मला असं विचारायचं होतं की सुचलं कसं तुम्हाला ?
(मग सौ.समीकरणेंच्या डोक्यात प्रकाश पडला .)
सौ.समीकरणे : “अच्छा ! माझ्या कुठल्याही गणिताविना वीजेचे बील कसे कमी कराल ? :कारणे वं उपाय या पुस्त्काबद्दल आपण बोलताय तर ! त्यानं काय झालं ना की. . .”
(फोनवरून)) पलीकडचा: “ कोणाचं ? ”
सौ.समीकरणे : “ सांगत्ये हो .मध्येच डिस्टर्ब नका करू बरं . . आमचं कॉन्सनट्रेशन जातं. …हं तर काय सांगत होत्ये मी ?
आमच्या चाळीत येणारा मीटर रिडींग वाला एकदा दिवाळी जास्त मागत होता.आम्ही पाळत ठेवली त्याच्यावर आणि एकदा मीटर मध्ये तार टाकतांना त्याचा फोटो काढला .तेव्हापासून सांगते दिवाळी मागणं तर सोडाच पण चाळीत कोणाची लाईट सुद्धा गेली नाही.असे बरेच उपाय दिले आहेत त्या पुस्तकात .त्यांत . . .”
निवेदीका : “ ठिके ,ठिके .तुमची जाहीरात नको कारण आम्हाला दुसऱ्या जाहीरातीही दाखवायच्या आहेत.
मंडळी … चॅनेल अजिबात बदलू नका .घेऊया एक व्यावसायीक विश्रांती.”
(ब्रेक मध्ये असंख्य जाहीराती… एक मुलगी विशिष्टं असं मीठ खाल्ल्याने कलेक्टर कशी बनते ,शाळेत जात असलेले भाऊ बहीण दाग अच्छे हैं म्हणत आपले शुभ्र कपडे चिखलाचे कसे करून घेतात , विशिष्टअसं मीठ खाल्ल्यानं सैफ अली खान थेट समुद्रात कसा जातो,साबणाच्या खरेदीतून पन्नास पन्नास पैसे वाचवून एक ग्रुहीणी काळजीने भाऊ पोहोचेल नं वगैरे म्हणून माहेरी मनीऑर्डर अशी पाठवते वगैरे जाहीराती संपल्यानंतर..)
निवेदीका : ‘ हॅलो दु:खी’ मध्ये पुन्हा आपलं स्वागत ! तर भूमितीबाई आपल्या पुस्तकात अजून कुठल्या कुठल्या समस्यांचे उपाय आहेत.? ”
सौ.समीकरणे : “ त्यांतील एका प्रकरणात मी मोबाईलचं बील कसं कमी करता येईल याबद्दल लिहीलंय.”
निवेदीका : “अच्छा म्हणजे सर्वात कमी दर असलेल्या कंपनीची सेवा घ्यायची असंच ना ?”
सौ.समीकरणे : “नाही हो ,ती तर घ्यायचीच पण तुमचे कॉल जर तुम्हाला वाचवायचे असतील तर समोरच्याला एक मिस कॉल द्यायचा .सो सिंपल ! आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगते ..आज जे लोक ही युक्ती वापरतायत त्यांनी ती माझ्याच पुस्तकातून वाचली आहे. या युक्तीचं पेटंट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय …..अजून एका प्रकरणात चपला कश्या कमी झीजतील याबद्दल मी लिहीलंय.”
निवेदीका :“कश्या कमी झीजतील हो चपला ?आमच्या दर्शकांनाही सांगा. . .
म्हणजे दोन दोन पायऱ्या सोडून चालायचे की काय ?”
सौ.समीकरणे : “चपला कमी झीजण्यासाठी तुमचा वरच्या मजल्यावर असलेला फ्लॅट तुम्ही भाडयाने द्यायचा आणि जिथे जिना नाही अशा तळमजल्याच्या घरात राहायचे.सो सिंपल ! अश्या बऱ्याच टिप्स तुम्हाला माझ्या पुस्तकातून मिळतील.”
निवेदीका :“आपला पुढचा फोन येतोय . . . , हॅलो दु:खी ! बोला.”
(फोन वरून:): ”नमस्ते ! मला आपल्याला विचारायचं आहे की आपल्या प्रकाशित होणऱ्या पुढच्या पुस्तकाचे नांव काय आणि ते कुठून प्रकाशीत होईल ? ”
सौ.समीकरणे : “ माझ्या आगामी पुस्तकाचं नांव आहे ‘गणितीय पद्धतीने ग्रुहव्यवस्थापन’ .ते पुण्याहून ड्रॅगन प्रकाशना कडून प्रकाशीत होईल. माझे वाचक माझ्या पुस्तकाची एवढी वाट पहातात ,याबद्दल मी स्वत:चं भाग्यच समजते. ”
(फोन वरून:) : “तसं नाहीये मॅडम ! दुर्भाग्य तर आमचंय की तुमची पुस्तकं आम्हाला वाचावी लागतात. ‘ गणितीय स्वयंपाक पद्धती’ हे तुमचं लिहीलेलं पुस्तक जेव्हा माझ्या बायकोने वाचलं तेव्हापासून ईतक्या वेगवेगळ्या चवीचे अन विचित्र वासाचे पदार्थ मला खावे लागतायेत की काय सांगू . वैतागलोय मी ! म्हणूनच . . . जिथे तुमचं पुस्तक छापायला द्याल, त्या छापखान्यालाच मी आग लावून देणार आहे ,म्हणजे ते पुस्तक कोणी वाचूच शकणार नाही. ”
(फोन बंद होतो.)
सौ.समीकरणे :“अरे बापरे !या गणितामुळे माझ्या आयुष्यात ‘ = ’च्या चिन्हापुढे ‘०’ यायची वेळ आलीय. यानंतर मी कार्यक्रमात थांबू शकत नाही. . . मी आता कटते ..सॉरी . . मी आपल्यापासून रजा घेते .क्षमस्व , येते मी. ”
निवेदीका : “या आपण ,पण जातांना पॉकेट माइक देऊन जा .नाहीतर निर्माते आमच्याकडनं वसूल करतील त्याचे पैसे . . .दर्शकहो .. या होत्या या सप्ताहाच्या मान्यवर . आपण अजून एका व्यक्तीला इथून दु:खी करून पाठवलं आहे. ”
पुढच्या आठवडयांत पहायला विसरू नका .याच ठिकाणी ….याच वेळी… आपला आवडता हा कार्यक्रम. . ‘हॅलो दु:खी’.
धन्यवाद !


पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

No comments: