Saturday, March 8, 2008

. . . माला बी मुंबैला -हाऊ द्या की रं ! (विनोदी लेख)

. . . माला बी मुंबैला -हाऊ द्या की रं ! (विनोदी लेख)
आवडती भैन आक्काला ,
मुंबैहून शित्याचा नमस्कार !
जसा गावाकडनं हिकडं नौक्री कर्तातसं पत्रं ल्ह्यायलाच जम्लं नै बघ.यक तं नवं काम .लैच यंगेज हूतो.
तुला सांगतो आक्क्ये , ईकडं पत्रं बित्रंकुणीबी ल्यित नै.सर्वे कानात काळ्या नळ्या टाकीत्येत आन खिश्यातल्या मॉबाइलवर बोलत फिर्तेत. . . गाडया - घोडयांवरनं ! माल सांग आक्क्ये आपल्याला कसं पर्वडायचं आस्लं म्हागडं स्वांग.
तुला आदूगर माझ्या कामाबद्दल सांग्तो .मी पिच्चरच्या टाकीत काम कर्तो. ईढं तीन चार टाक्या येक्काच इमार्तीत आसत्यात. शहरातले सायबं दिवसा काम करत्येत आन संध्याकाळी पिच्चर पाहात्येत.आश्याच येका थेट्रात मी फूड कौंटर वर काम कर्तो . . . आरं द्येवा , तुल कसं समजंल फूड कौंटर म्हंजे काय ते ? सांग्तो.
शहरातली मान्सं .पन्नासच्या पोत्यात आनखी पंधरा ईस किलू टाकल्यावर गोनी कशी टम्मं फुगंल ना तशी यांची शरीरएसटी आसते आन मंग यांना खायला लै लागतं .काही बाप्ये तं थेट तिक्टाच्या लायनीपास्नंच हादडायला सुरु करतेत.
पिच्चर पान्यासाठी येत्येत इथं आन मंग त्ये इथल्या फूड कौंटरवर यून लाह्या ,बटाटा येफर ,समोशे आसं काय काय इकत घेत्येत.च्या कॉफी , फसफसनारी सरबतं आन आइस्क्रिम बी आस्तंया.
हाँ मातूर घेत्येत.कॉफी च्या हातानं नै बनवित.स्पेश्यल मिशीन आस्तं .बटन दाबलं का लग्गेच गर्रम कॉफी तैय्यार .आशाच येका मिशीनवर सायबानं मल काम दिलंय.
सांगायचं इसरलो तुला आक्क्ये ,इकडं पावचे लै जिन्नस मिळत्यात .बर्गर म्हंत्येत त्येला .गावाकडं आपुन कुत्र्यालमांज्राला पाव खाऊ घाल्तो पन इथली मान्संच जेवन जेवायचं सोडून पावच खात्येत.
आपला द्वास्तं बी तिथल्लाच .त्यानं माला यक नवा परकार खायला दिलता .तेच्यात मटनाची कोर्डी भाजी आस्ते.पहील्या घासालाच मी इचारलं ,“नांव काय रं ह्याचं ?”
तसा त्यो म्हनला ,“ हॉटडॉग !”
छ्या ! नांव ऐकलं आन दिलान फ्येकून मी ,म्हनलो,“गडया ,आपल्याला काय समजलास ? कुत्र्याचं मटन नै खात आपून !”
तवा मित्र समजौन समजौन पर्शान झालता की येच्यात कुत्र्याचं मटन नै फक्त नावच तस्लं इचित्रं हाय म्हणून.
तवा आपुन मानलो .काय पन नाव ठिवलंय म्हनं ‘हॉटडॉग !’
इथल्या पिच्चराच्या टाक्या फ़ुल्ल येरकंडीशन आस्तेत. येवढं थंडकी वाटतं येवढयांत आपण ढगात त नै नं पौचलो ? पन खरं सांगू आक्क्ये , माला गावाकडची लै आठवण येती.सालं इथल्या लॉकांना थंडाव्यात बसता यावं म्हणून मंडळ इज पुरवतं आन गावाकडं आपला बा गद्धा म्ह्येनत करून करून आन रगताचं पानी करून शेती पिक्वित व्हता तं तेच्या मोट्रीला मातूर इज नाय.आसा कसा हा अजब न्याय ? डॊळं भरलं बग माजं ल्हिता ल्हिता .बरं ते जौ दे ,येक गंमत सांग्तो तुला इथल्या बाजाराची.
. . . यकदा द्वास्तं माला म्हनला का ,चपला ,बुटं,कपडे,साबनी,भाजीपाला सारं येकाच दुकानात मिळतं म्हणून,मला खरंच वाटंना .
मी ईचारलं,“खरंक्काय ल्येका ? का चेष्टा करतोस माझी ,व्हय रं ?”
तसा त्यो म्हन्ला,“खरं नाय ना वाटत तुला ?येकदा संगच जौत आपन ” आन मंग ग्येलो नं आम्ही.
तिथेबी थंडी हावा.ह्ये शहरवाले दुकानदार, मान्सांना दारातंच गार करून टाकत्येत..ह्ये वारं चालू सुसाट !जातांना पोलीस व्हता दारात.आता सर्वीकडंच आस्तेत.पन काय येळ येती येकेकावर बघ ना आक्क्ये .गावाकडं पोलीसदादाला आपन रामराम करायचो .आन ह्यानं ? ह्यानं आम्हालाच सलाम ठॉकला ना !
आन मंग ग्येलो मंदी. आगा गा गा !आठवडयाचा बाजारच जसाह्यी येवढी मोठी पसरलेली दुकान . तुला सांग्तो आक्क्ये ,येका नजरंत मावंना !
इकडं ब्यॅगा मस्तं टांगलेल्या ,छत्र्या तिकडे टांगलेल्या ,पलीकड ल्हानग्यांसाठी खेळणी,तिकडे किराणा ,येका बाजूला चपला आन बुटं तं येका बाजूला मॉबाइल,कॅमरा फिमरा आशा म्हागडया इले ट्रानीक चीजा,वरच्या मजल्यावर बी साड्या ,पॉरा पॉरींचे कपडे ,काचसामान ,आत्तरं आरारारा ! कुठं कुठं बगू आन किती किती बगू आसं झाल्तं माला.
तिथे काम करना-या प्वारी प्वारांच्या डोक्यांवर लाल टोप्याआन अंगात लाल सदरे आन तशीच प्यॅंन्ट पाहून दॉस्ताला म्हनलं,“सगळे बॅंडवाले आन्ले क्काय पकडून ?” तसं त्याला बी हासू आलं.
नजर फिरवून पाहीलं सारे बाया बापडे आपल्या पॉरा सॉरांना घ्यून ट्रॉल्या घ्यून फिरत होते.
मी द्वास्ताला इचारलं ,“ द्वास्ता ,ही ट्रॉली कशापायी रं ?”
तसा त्यो म्हनला ,“आपल्याला जी वस्तू पाहीजे ती ट्रॉलीत आपण टाकायची अन तिकडे शेवटच्या बाजूला पैसे द्यायचे.”
त्याला पुढे इचारलं ,“आस्सं ? नांव काय रं ह्या दुकानाचं ?”
त्यो म्हनला,“बीगबाजार !”
आयक्लं आन जे हासू आलं माला आक्क्ये ! त्यानं कारण इचारलं.मी म्हन्लं.“आरं ,पैशे देनारे आपूनच आन तरीबी दुकानभर
भिका-यावानी स्वताच झोळीत वस्तू टाकत फिरायचं . . . हा कसला बीगबाजारल्येका ?. . . हा तर भीकबाजार !
तुला सांग्तो आक्क्ये ,इथे लईच गोष्टी येगळ्या हाईत .घोळक्यातला पॉरगा कोन्ता आन पॉरगी कोन्ती ते ऒळखूच येत नै बग .आगं का
म्हनून काय इचारती ?इथाल्ले प्वारं संकराच्या जटेवानी लांब क्येसं वाढवित्येत, वेण्या घालीतेत,आन प्वारी? त्या प्वॉरांवानी शर्ट पॅंन्डांवर फिरतेत. बहुतेक प्वारं ऊजडे चमन आस्त्येत आन प्वारी ? क्येसं येक तं छोटे कर्तील, नै तं रंगवित्येत .रंग बी आशे येकेक .
. . .सोनेरी ,चंदेरी आन काय काय .गावाकडं शेनानां जमीन सारवल्यावर रांगोळीसाठीपोरी बाळीजमीन रंगवायला वापर्तेत तसा गेरूचा रंगबी ह्ये लोक यांची टकूरी रंगवायला वापर्तेत,आत्ता बोल.
पन ह्या क्येसांच्या रंगापायी माझा लय गोंधूळ होतूय.
कॉफी घ्यायला येना-या गि-हायकांमधी म्हतारी दिसती म्हून ‘मावशी’ म्हनावं तं ती तरनी निघती आन ’ताई‘ म्हनलं तर ती माय येवढी आस्ती. इथल्या बायाबी साडया नै घालत.त्या घालत्यात पंजाबी डरेस आन त्यांना वाटतं ‘म्येरी त्वचा से मेरी उम्रं का पत्त्ताच्य नै च्यलता.’
काही प्वॉरींना वाटतं , सोनेरी रंग क्येसांना लावला तं आपन लै भारी दिसू .पन आक्क्ये क्येसांचा रंग बदलला म्हनून आंगाचा थोडाच बदल्ता येतो ?
आंगाचा कलर आस्सा काळा .पक्की ग्यारंटी . . . धुतला तरी जानार नै .कलर ग्येला तं पैसे वापस.तं आशा प्वॉरींनी क्येसं रंगवल्यावर ,माल्सांग ,त्या च्येटकिनी नाय दिसनार तं काय दिस्तील ?
इथल्या रस्त्यारस्त्यांवरून पायी नै तं गाडयांवर फिरनारी ‘यक दुज्ये क्ये लिये’ जोडपी दिस्त्यात.तुला सांगतो आक्क्ये,गाडीवरून जातांना ही प्वारी प्वारं आपल्या मुस्कटांना फडकी आश्शी गुंडाळत्येत का त्येंचा बा बी नै वळखू शकत त्येंना या आसल्या ‘स्पैडरमन’ रुपात.
तुला सांग्तो आक्क्ये , इथल्या भवान्या दुचाकीवर डबल शीट बसतांना येवढं चिटकू - चिटकू बसत्यांत का जसं काय आनिक एक मानूस तिथं बसायचा हाय.मी म्हंतो - जरा मोकळं ढाकळं बसायचं ना रे गडयानहो .काय सांगू ? आश्या नमुन्यांकडं पाहील्यावर माझी मालाच लाज वाटती.
इथल्या प्वॉरा प्वॉरींची नावं बी येगळीच ! . . . आता काय ,सर्वेच शिरीयली पाहात्येत मग प्वॉरींचीनावं . . . ‘शिवानी’,‘शिबा’,‘शिना’,‘शिखा’, आरारारा !ऐकलं तवा वाटलं - यांच्या बापांना ‘शी’ शिवाय दुसरी कोन्ती चांगली सुर्वात नाय का सुचली . . . नावासाठी ?
प्वॉरांची नावं कुत्र्या-मांजराला देत्यात तशी आसत्यात ‘बॉबी’,‘रॉकी’,‘व्यंकी’,‘पॅडी’,‘मॅंडी’,‘व्हीटो’,‘मिंटॊ’, वगैरे.
साराच येडयांचा बाजार !
आक्क्ये , याच्यापेक्षा आपलं गांव बरं .आजून तरी तिथं लाज बीज,मान मरयादा टिकवून हौत आपन.
थेटरात काम कर्तो तं थोडा थोडा पिच्चर मधनं मधनं पाह्यला मिळतो .पन आक्क्ये ,ह्याआत्ताच्या पिच्चरांमंदी काय दम -हायला नै बग आत्ताच्या . . . !
आर्ध्या हिंदी पिच्चरांचे नावं इंग्रजीतनं आसत्यात आन पाहावं तरी काय तेच्यात ? झुरळं -मुंग्या मारावी तशी शिन्मातली मान्सं मान्सांना मारून टाकत्येत आन नंतर गानंबी काय ? तं ‘ये गन्पत ,च्यल दारू ला ’ .हात्तिच्यामा ऽ ऽ ऽ ऽ री.
यकदा काय झालं .नुक्तीच लग्नं झालेली येक माहामाया कॉफी घ्यायला आली .मी दिली , बाकीचं पैसं परत क्येलं .तरी बया जागची हालंच ना .बाकीच्यांना बी सर्व्ह करायचं व्हतं,मी तिला तसं सांगीतलं .तं म्हन्ली ,“मॉन्टी उचलेल ना !”
आपल्याल वाटलं मॉन्टी तिचा हरकाम्या नोकर आसंल. आन आसंल. कुठेतरी आन त्योच यून उचिलतोक्काय कॉफीचे मग.
तरीपन खात्रीसाठीमी इचारलं ,“म्यॅडम ,हा मॉन्टी कोन ?”
त्यावर ती म्हनली ,“नव्रा आय माझा !”
बग आक्क्ये बग ! नव-यालाबी कशा वागवतात इथल्या बायका !
लईच झाल्या शहराकडच्यांच्या कुचाळक्या .तुझ्या बद्दल इचारलंच नै.
कशी हैस तू ? . तब्येतीला जप.जास दगदग नकू करत जौ .रघू साळंत जायला लागला आसंल. पुढच्या येळला त्येच्यासाठी मस्तं मंकी वाश जीन घेऊन यील.पाव्हनं काय म्हनत्येत.
माय आन बा ची तब्येत काय म्हनती .मायला सांग का तिच्या दुखना-या गुडघ्यांसाठी येक पट्टी हिकडं मिळते . . .नी कॅप , पुढच्या येळला घेउन यीन.बा ला बिडी कमी पे म्हनून सांग .लै खोकल्तो त्वा.येत्या सोम्मारी पयला पगार व्हईल ,तवा लगंच पोस्टानी मनी ऑर्डर करंल सांग त्येन्ला.
माझी काळजी करू नगंस .तुमची खुशाली कळीव .पत्र लिही.

तुझा लाडका भौ,
शिरपत.

पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

No comments: