Monday, February 27, 2012

चारोळ्या


सरकती टोपी पाहून ती म्हणाली,


आलं भूत आलं,


त्यानं जवळ जाऊन पाहीलं तर,


टोपली खाली खेळत होती मांजरीची दोन पिल्लं !


……………………………………………………………………………………………………


आंदोलनामुळे कांदा स्वस्त झाला


महाग झालाय लसूण ,


तुला झोप लागते का ?


माझी तर उडालीये तू भेटल्यापासून !


……………………………………………………………………………………………………


वाचणारं कुणी असेल ,


तर sms करायला काही अर्थ आहे,


Call करणारंच जर कुणी नसेल,


तर miss call सुद्धा व्यर्थ आहे !


……………………………………………………………………………………………………


दूर एका पडक्या वाड्यामध्ये


पडले होते खूपसे दो-या आणि खोके,


तिकडून दोन उंदरं आले


अन मजेत खेळू लागले झोके !


……………………………………………………………………………………………………


चंद्र ढगाआड असला तरी


आकाशातच कुठेतरी तो आहे,


माझा चेहरा तुला आठवत नसेल कदाचित


मी तर तुझ्या ह्रुदयातच आहे


……………………………………………………………………………………………………


Education makes life meaningful,


But love makes life beautiful !


……………………………………………………………………………………………………


बांधावरल्या झाडाच्या डहाळीवर


बसलं पोपटाचं पिल्लू ,


तिकडून पावसाची सर आली,


ते मजॆत लागलं डोलू !


……………………………………………………………………………………………………


माझ्यातला “मी” न काढता ,


मला तू दिसत नाही,


तसंही समर्पित न करता स्वत:ला ,


देव काही दिसत नाही.


……………………………………………………………………………………………………


नसतांना जवळ तूला मी खूप करतो miss,


मनात तुझ्या आठवणींचं फिरतं मोरपीस !


……………………………………………………………………………………………………


विसरायचंच आता तुला ,


असं ठेवलं होतं पक्कं ठरवून,


दुस-या दिवसाची सुरूवात मात्र झाली,


तुलाच स्वप्नात पाहून !


……………………………………………………………………………………………………


खूप वेळ घालविला गणितात,


बघायला की माझी चूक नक्की कुठे होती ?


नंतर लक्षात आलं की ती तर,


पुस्तकातच printing mistake होती !


……………………………………………………………………………………………………


चोरून लपून ,


तुला बघण्याचा,


छंदच लागला बघ ,


मला त्याकरिता जगण्याचा !


……………………………………………………………………………………………………


किती कोमल –किती सुखद,


तुझ्या – माझ्या भेटीचे क्षण,


हातातून अलगद निसटून जावेत


जसे वालुकाकण !


……………………………………………………………………………………………………


सौंदर्य वाढवायला केसांचं,


निवडला रंग तिने चंदेरी,


अन हेअर डाय केल्यावर ,


दिसू लागली जख्ख म्हातारी !


……………………………………………………………………………………………………


भरभरून बोललो तुझ्याशी,


असं कधी होत नाही,


पण तुझ्या भेटीची ओढ मात्र


त्यामुळे कधी सरत नाही .


……………………………………………………………………………………………………


प्रवासात वा-यानं केस गळू नयेत म्हणून,


डोक्याला रूमाल बांधून तो केसांचा बचाव करायला गेला पण


गाठ मारतांनाच एक केस ,


त्या गाठीत सापडून मेला !


…………………………………………………………………………………………………


एकदा एक भ्रष्ट नेता,


‘वर’ गेला,


घेऊन चिरीमिरी,एंट्री स्वर्गात दे,


साक्षात ब्रम्हदेवालाच म्हटला !


……………………………………………………………………………………………………


काठोकाठ भरलेले ढग पाहीले ना,


की मला तुझे पाणीदार डोळे आठवतात,


तुझ्या आठवणींचे मोर,


तेव्हा मनी माझ्या नाचतात !


……………………………………………………………………………………………………


तु मला आवडतेस ,


हे नसेल तुला जरी कळत,


मी मात्र प्रेम केलं तुझ्यावर,


माझ्याही नकळत !


……………………………………………………………………………………………………


तुझ्या आठवणी अश्या येतात


की त्यापुढे संयमशक्ती पडते फिकी ,


चोरी-छुपे यावा सीमेपलीकडून ,


जसा एखादा अतिरेकी !


……………………………………………………………………………………………………


एकदा एकजण व्यसनमुक्ती केंद्रात दारूबंदीच्या व्याख्यानाला गेला,


पण काहीच नाही भाषणातलं,


या फ्रस्टेशनमुळे,


बाहेर येऊन बाटलीभर दारू प्याला !


……………………………………………………………………………………………………


ज्याने जगाला अहिंसा शिकवली जगाला,


त्याच्यावर हा अन्याय कैसा,


खून पाडतात ,त्याचा फोटो असलेल्या वस्तूसाठी,


ज्याचे नांव पैसा !


……………………………………………………………………………………………………


अजूनही जळक्या पोळ्या पाहील्या की


मला तुझी आठवण होते,


माझ्या मनाची म्हैस मग


तुझ्या आठवणींच्या पाण्यात डूंबुन जाते !


……………………………………………………………………………………………………


इतना गॅंवाया जिंदगी तुझसे,


अब तो आरजू भी ना रही कुछ पाने की,


लेकीन गॅंवाके इतना पाया की


अब तसब्बूर ना रही जीने की !


…………………………………………………………………………………………


उंच उडेल निळ्या आकाशी ,


पतंग आपली कटणार नाही,


तुझी - माझी साथ ही जन्मोजन्मीची,


अशीच काही सुटणार नाही !


……………………………………………………………………………………


तु उन ,


मी सावली,


सहवास तुझा ,


मला पावलो-पावली !


………………………………………………………………………………………


जीवन कमी पडावं आनंदात जगतांना,


कमी पडावं आकाश स्वच्छंदी विहरतांना,


शब्द कमी पडावेत मला,


तुझ्याशी प्रेम व्यक्त करतांना !


………………………………………………………………………………………


तु मला भेटलीस जसं आइस्क्रीम वर जेलीचं addition,


जळगावी वांग्याचं भरीत ताटात अन जोडीला कवठाच्या गोड चटणीचं combination,


आता ना दिवसाचा काही हिशोब , ना रात्रींचे calculation,


तुझे माझ्या प्रति प्रेम हेच प्रिये तुझं qualification !


………………………………………………………………………………………


रॅपर न उघडता जसं,


आतलं गिफ्ट काही कळत नाही,


सान्निध्यात आल्याशिवाय तिला,


मन काही त्याचं कळत नाही !


…………………………………………………………………………………………


मुलांबद्दल पालकांना ममत्वाच्या,


काही उरल्याच नाहीत feeling ,


म्हणून तर घडतात


रोज सर्रास honour killing !


…………………………………………………………………………………………


त्याची तिला एकदा आठवण आली,


दवबिंदूंनी गवतपर्णे मोतीमय जाहली,


फुलपाखरासम सृष्टी रंगमय बनली,


अश्रूंची तिच्या फुले जाहली !


…………………………………………………………………………………………


कशी काय विसरतेस इतक्या लवकर,


तू सगळ्या जुन्या गोष्टी,


आठवणींनी तुझ्या मात्र


होतो कित्येकदा कष्टी !


…………………………………………………………………………………………


कधी रिमझीम,कधी मुसळधार,


पाऊस असा पडतोय,


बदलत्या काळानुसार,


तोही पॅटर्न बदलतोय !


…………………………………………………………………………………………


पराग खैरनार,नाशिक मोबाईल क्र. 8698 390822


E-mail ID: paragkhairnar@gmail.com


visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

‘शोले ’ ( शरद उपाध्येंच्या व्याख्यानातून ….! )


२०१०साली महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अचानक ‘ज्योतीषशास्त्र ’ हा विषय समाविष्ट केला गेला.काही विद्यार्थ्यांना तो समजत नसल्याने विशेष व्याख्यानासाठी खुदद्‍ ज्योतिषाचार्य शरद उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आले.


आता मुलांना हा विषय सोप्या पद्धतीने शिकवणे हे आव्हान त्यांच्यापुढे होते.त्यांनी विचार केला की ,मुलांचा आवडता विषय ‘चित्रपट’.एखाद्या चित्रपटातून आपल्याला ज्योतीष समजावता येईल का ?


त्यांनी उपस्थितांना विचारले ,“मुलांनो तुम्ही ‘शोले’ पाह्यलाय का ?”


विद्यार्थी: “कुठला ? जुना की रामगोपाल वर्माचा ?”


ज्योतिषाचार्य:“ जुना .”


विद्यार्थी :‘हो ’ .


ज्योतिषाचार्य:“ ऐका तर मग.मी त्या आधारे तुम्हाला हा विषय समजावणार आहे.” अश्या पद्धतीने त्यांनी व्याख्यानाला सुरूवात केली.थोडे जोक्स्‍,थोडं ज्योतीष,थोडे पौराणिक दाखले देऊन त्यांनी व्याख्यान रंगवले.


“ सर्वांना शरद उपाध्येचा नमस्कार !


थोडी प्रस्तावना करतो.मुळात का ऽ ऽ य की एका छोट्याशा गावा ऽऽ त ही गोष्ट घडते. . . रामगढ ! तिथले लोक शेती ,माळीकाम अन्‍ मोलमजुरी करणारे ! अन्‍ वेळ मिळाला ऽ ऽ तर एकत्र येऊन ऽ ऽ होळी खेळणारे !पोलीस इन्स्पेक्टर ठाकूरभोवती ऽ ऽ कथा फिरते.त्याचं . . . . पत्नी,भाऊ,बहीण,मुलगा,सुन,नातू असं मोठं कुटुंब ! हो ऽ ऽ तं का ऽ ऽ य की हा ‘गब्बरसिंग’ नावाच्या फे ऽ ऽ मस्‍ डाकूला अटक करतो अन्‍ तिथून सगळ्या सूडनाट्याची सुरूवात होते तोच हा शोले !आता आपण ऽ ऽ या दोघांच्या कुंडल्या बघू . . .


गब्बर – हा कुंभ राशीचा . ही राशीचक्रातील संचयी रास! कुंभ म्हणजे मडके.मला आठवते. . . . लहानपणी पाणी भरतांना ,मडके कधीच काठोकाठ भरले नाही. जरा विचार करा ऽ ऽ.गाववाल्यांकडनं नेलेल्या धान्याचं त्यानं काय केलं ? कधी पार्टी केली की कधी दरोडेखोरांचं ‘गेट टुगेदर’ केलं ,असं झालंच नाही.आता आपण ऽ ऽ ठाकूरची रास बघू. . . ठाकूर - हा सिंह राशीचा.


मुळातंच राजेशाही लोकांची ही रास ! सिंहाकडे बघा. . .अगदी म्हातारा किंवा जखमी असला तरी तो जंगलाचा राजा असतॊ,हे आपल्याला दोन्ही हात गमावलेल्या ठाकूरच्या गब्बरशी बाणेदारपणे बोलण्यावरून सहज लक्षात येतं. अरे इथे पेंशन मिळायची मारामार पण तो म्हणतो,“जब तक जियूंगा सर उठा के जियूंगा !”. काय तो बाणेदारपणा ! काय ती करारीवृत्ती !


या दोघांच्याकडे कुंडलीप्रमाणे पहाता असे लक्षात येतं की या दोन्ही ऽ ऽ शत्रुराशी ! अन्‍ थोडा थोडका नाही तर साक्षाऽऽ त्‍ मृत्यूषडाष्टकयोग ! म्हणजे पुढे ऽ ऽ या दोघांपैकी एक नक्की खपणार आहे हे लक्षात येतं ”


गब्बरने आपल्या कुटुंबियांना मारलेलं पाहून ठाकूर तडक सूड उगवायला निघतो.इथे आपण सिंह राशीची वैशिष्ट्यं समजावून घेऊ. सिंह ही अत्यंत तापट रास !


असं म्हणतात की ,मीन हे शरदातलं शीतल चांदणं अन्‍ सिंह हे मध्यान्हीचे प्रखर ऊन !


सिंह राशीच्या व्यक्ती भडक डोक्याचे असतात ,यांनी आपल्या रागावर नियंत्रण हे ठेवलेच पाहीजे .


विष्णूपुराण जर तुम्ही वाचलं असेल तर त्यांत एक सुंदर श्लोक पंधराव्या अध्यायात दिला आहे की,“ क्रोधं वर्जम्‍ सज्जना: ”


कारण क्रोधात केलेली कोणतीही कृती आपला नाश ओढवून घेणारी असते.


तसंच ठाकूरचं झालं . . .


अनावर संतापामुळे संकटात त्याने डोळे झाकून उडी मारली .गब्बरला पकडायला साधा कॉन्स्टेबलही बरोबर नेला नाही.याचा परिणाम ह्यायचा तोच झाला. . . गब्बरला तो आयताच सापडला अन्‍ त्याचे दोन्ही हात गब्बरसिंहाच्या माणसांकरवी चरवीतून ऊस कापावा तसे पट्टकन कापले गेले.इतकं भयंकर दृष्य आहे ते की वाटतं अगदी वै-यावरही असा ऽ ऽ प्रसंग येऊ नये.


मगर गब्बरचा सूड पुर्ण करन्यासाठी ठाकूर जय-वीरूला बोलावतॊ.हे दोघे भुरटे चोर यांच्या कुंडल्याही गमतीशीर आहेत त्या आपण पाहू.


जय . . . . हा मकर राशीचा . राशीचक्रातली ही आळशी रास !


इथे एक उदाहरण देतो की वीरू बसंतीला जेव्हा नेम धरायला शिकवत असतो तेव्हा दूर झाडाखाली हा जय झोपलेला असतो आणि तरीही इतक्या दुरून ऽ ऽ ऽ जवळजवळ फर्लांगभर लांबून तो नेम कसा लावू शकला ? याचं कारण म्हणजे आळशी असले तरी मकर राशीचे लोक प्रगती करतात.या मकर राशीच्या लोकांमध्ये स्वभावत:च आळस असतो.


मगर पहा . . . . पाण्यात कशी सु ऽ ऽ स्त पडून असते.पुढे हा जय ठाकूरच्या सुनेवर लाईन मारतो पण मनातलं तिला सांगत मत्र नाही याचंही कारण आळसंच !


आता वीरूची रास पाहू. . . वीरू हा वृषभ राशीचा !


चित्रपटाच्या शेवटी वीरूच्या लक्षात येतं की जयनं आपल्याला एकाच छापाचं नाणं पिक्चरभर दाखवून फसवलंय पण ते तसं नाहीये कारण त्याने ते नाणं कधी स्वत: चेकच केलं नाही.अशी दुस-यावर गाढ विश्वास ठेवणारी माणसं म्हणजे वृषभ !


काठी टोचल्याशिवाय बैल जसा स्वत:च्या बुद्धीने एक इंचही पुढे सरकत नाही तसे हे लोक असतात.


वीरू जयचंच शेवटपर्यंत ऐकतो.


स्वत:ची बुद्धीच कधी त्याने वापरली नाही की अरे, नेहमी छापाच कसा येतॊय ? यात काही गोलमाल तर नाही ना ? अशी साधी शंकाही वीरूला तीनतासात एकदाही आलेली नाही.


यानंतर आपण काही विनोदी अन गंभीर पात्रं पाहू. . . .


बसंतीची मौसीची रास मिथुन.या मिथुन राशीचं वैशिष्ट्यं म्हणजे हे लोक नाटक करायला वस्ताद असतात.


वीरू अन बसंतीच्या लग्नाला ही मौसी त्यांच्या प्रेमप्रकरणाची चांगली गांवभर बोंब झाल्यावर संमती देते


मग आधी का नाही देत ? याला कारण तुमची रास ! तुम्ही कसे असता ,ते तुमच्या राशीवर अवलंबून असते.


सुरमा भोपाली. . . . हा गावचा लाकूड व्यापारी ! जय-वीरूला तुरुंगात पाठवतॊ तो हाच . . . याची रास मेष ! ही मुलत:च द्विस्वभाव रास म्हणून तर जय-वीरूच्या पश्चात तो त्यांची टवाळी करतो अन ते समोर येताच हा बहाद्दर त्यांच्या पाया पडतो.


मेषेच्या व्यक्तींबद्दल एक लक्षात ठेवावं की हा मेंढा आहे.एकतर तो ढुशीतरी देनार नाहीतर शिंग तरी खुपसणार !


Accidents च्या केसेस चेक केल्यात तर बहुतेक accident हे मेषेच्या व्यक्तींमुळे होतात हे लक्षात येईल.


आता आपण रहीमचाचांची रास अभ्यासूया . . . . .


हे मारल्या गेलेल्या अन्वरचे वडील .तुळ राशीचे .तुळ ही थोडी भावूक तर थोडी व्यवहारी रास आहे.हे लोक अत्यंत निष्पक्ष अन न्यायप्रिय लोक असतात.जय-वीरूला गावात आणल्यानेच अन्वर ठार झाला तरी त्यांना गावाबाहेर काढून द्यायला रहीमचाचा मुळीच तयार नाहीत.कारण जय बरोबर वीरू अन वीरू मागे बसंती जाणार अन मग नमाजला जातांना कधी मधी तिने हात पकडल्यावर म्हाता-याची जी थोडी फार enjoyment व्हायची ती बंद नाही का होणार ?


या राशीबद्दल एक सांगता येईल . . . . संस्कृतात एक श्लोक आहे “न कदाचिनं जायन्ते शीतांशो: उष्णरश्मंय” .चंद्रापासून कधीही उष्ण किरण उत्पन्न होत नाहीत तसा सज्जनांपासून कोणालाही त्रास होईल असे ते वागत नाहीत आणि म्हणून “कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेचि कदाचितं” अशी त्यांची वृत्ती असते. हे झालं भाऊकपणातुन पण या राशीची व्यवहारी बाजू कोणती ?त्यांना का नाही जोश आला गांववाल्यांसारखा ? जय-वीरूला गावातून “जा” म्हणायला,कोणाच्या बापाचं काय गेलं असतं ? पण हे जर दोघे निघून जातील तर बसंतीही वीरूबरोबर जाईल मग अन्वर तर आधीच खपलाय आता रहीमचाचांना नमाजसाठी दर्ग्यापर्यंत कोण सॊडेल ? तर बसंती ! ती जायला नकॊ म्हणून त्यांनी जय-वीरूला गावाबाहेर जायला आक्षेप घेतला.अशी विलक्षण सद्सदविवेकबुद्धी तुळवाल्यांकडे असते.


आता आपण सांबाची कुंडली बघू . . . हा गब्बरचा शार्पशूटर !


नेहमी खांद्यावर बंदुकीचा बेल्ट अडकवलाय. कुठेतरी बंदुकीनं निशाणा धरलाय.असा तो आपल्याला दिसतो यावरून लगेच लक्षात येतं की हा धनू राशीचा !


ही माणसं टोकाची संयमी असतात.याचं एक सुंदरसं उदाहरण देतो.गब्बरने strict instruction दिली असल्याने बसंती नाचून तिचं गाणं होईपर्यंत हा अगदी तस्साच चाप ओढून उभा आहे.तो बंदूक खाली ठेवतही नाही अन गोळीही सुटू देत नाही,अशी परकोटीची संयमी माणसं म्हणजे धनू रास !


असं का व्हावं ?


इतका वेळ हात असाच ठेवला तर किती दुखेल ? मग अमृतांजन लावावं लागेल .तिथे रामगढावर कोण आहे सगळ्या डाकूंमध्ये सांबाला बाम लावून देणारं कुणी नाही तरीही ह्या राशीची लोकं आपला संयम कायम राखतात.


आता आपण जेलरची रास पाहू . . . .


हा अंग्रेजोके जमानेका जेलर कन्या राशीचा ! या राशीची माणसं भित्रट असतात.


मलये अपि स्थितो,वेणू ऽ ऽ वेणू ऽ ऽ एव न चंदन !


सिंहाची कातडी परिधान केली तरी तरसाला काही त्याच्यासारखं लढता येणार नाही.म्हणून साधी नळी दाखवून जय-वीरू तुरूंगातून फरार होऊ शकले.


आता गब्बरची रास बघू . . . .


गब्बरनं अन्वरसारख्या निरपराध तरूणाला का मारावं ?


त्यानं ठाकूरलाही पुरतं मारलेलं नाहीये . . . गाववाल्यांनाही तो छळतोय.पोलीसांपासून दूर पळतोय.


हा गब्बरसिंग असा का वागावा बरं ?


कारण त्याच्या राशीत आहे . . .वृषभेचा शनी वक्री असतांना जर चंद्र बाराव्या स्थानी आला तर अशी विपरीत बुद्धी होणारंच !


त्यांत शेवटी तो बसंतीलाही पळवून आणतो. मुळात काय ?


आधीच तो मर्कट , त्यात चक्रम, मग मद्यही प्याला अन घोटाळा झाला – तसला हा प्रकार !


गब्बर जयला ठार मारवतो याला कारण “ विनाशकाले विपरीत बुद्धी ! ”


चित्रपटाच्या शेवटी ठाकूर गब्बरला मारून न टाकता “ कानून के हवाले ” का करतो हे या छोट्याशा ओवीवरनं लक्षात येईल. “ दिधले दु:ख पराने ,फेडू नयेचि सोसावे ,


शिक्षा दैव तयाला करील म्हणोनी उगाचि बैसावे !”


म्हणजे काय ? जी शिक्षा करावयाची ती देवच करील हा शहाणपणा तापट सिंह राशीच्या ठाकूरला तीन तासांची कहाणी घडून गेल्यावर सुचला आहे. अश्याप्रकारे या कहाणीचा सुखांत आपल्याला पहायला मिळतो.
पराग खैरनार,नाशिक मोबाईल क्र. 8698 390822


E-mail ID: paragkhairnar@gmail.com


visit my site: www.hasyakavitaa.blogspot.comTuesday, September 28, 2010

“प्रेम करावं”

प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥ध्रु.॥
जगावं एकदाच
पण प्रेमात पुन्हा पुन्हा मरावं,
आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥१॥

रोज रोज येते,
ती त्याच्या स्वप्नात
कसं सांगू तिला ?
रोज तो म्हणे मनात
प्रेमा तुझ्यासाठी बुद्धीवंतांनीही हे वेडेपण पत्करावं
प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥२॥

ती हट्टी,
म्हणून तो कष्टी
तिच्या मोठ्या- मोठ्या ढापणातून त्याने
‘कुठे डोळे दिसतायत का ?’
प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥३॥

तिचं कठोर वागणं ,हसत हसत झेलावं,
तिच्या सगळ्या टोमण्यांना, त्याने टोलवून लावावं,
डिओ लावला नाही तिनं ,
तर बोलतांना त्यानं रूमालात नाक धरावं,
तिच्या नाजूक ओठांवरच्या आगंतुक मिशांसकट ,
त्यानं तिला स्विकारावं,
प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥४॥

प्रेम कळण्यासाठी मित्रांनो,
मन असावं लागतं,
पण मन जाणण्यासाठी मात्र,
छातीत हृदय असावं लागतं,
हृदय नसलेल्या दगडांनाही,
प्रेमात आपण कवटाळावं,
प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥५॥

पहीलं पत्र दोस्तीचं
दुसरं जिवलग मैत्रीचं
नातं हे तुझं – माझं जन्म-जन्मांतरीचं
लागा-बांधा काही नसतांना
संपर्कात येण्यासाठी धडपडावं
प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥६॥

या प्रेमात कधीकधी ,
खावी लागते चापट,
कारण असते एखादी प्रेयसी,
निर्बुद्ध अन्‍ तापट,
चूक काही नसतांनाही,
शांतपणे मुस्काट पुढं करावं,
तिच्या त्या स्पर्शानं क्षणभर का होईना,
त्याचं अंग रोमांचित व्हावं,
प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥७॥

गुणांनाच काय तिच्या अवगुणांनाही त्यानं स्विकारावं
प्रेमात तिच्या त्यानं स्वत्वं आपलं समर्पित करावं
तिच्या कोमल हातांनी
त्यानं विषही हसतमुखानं प्यावं
मनमंदिरात तिच्या त्यानं
स्मारक बनून उरावं
प्रेम करावं,प्रेम करावं,आयुष्यात एकदातरी प्रेम करावं ॥८॥
पराग खैरनार,नाशिक
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com
parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com

Wednesday, June 30, 2010

“ऒला पाऊस”

आला पाऊस ऒला ,
आनंदे नाचूनि बेडूक मेला

आल्या धावून सरी ,
पण मडकं राहीलं घरी !


म्हणे तो, “जाऊ पावसात,खाऊ मस्त पिझ्झा ”,
परि ती दटवी तयाला , “ खिचडी खा अन्‍ गप निजा ”

कोसळला पाऊस किती ,
रस्त्या-रस्त्यांवर ओली माती

“ केव्हापातून लागून ल्हायलाय हा ! ”
म्हाता-यांची निराळीच किरकिर
पेन्शन मिळाया स्टेटबँकेमधूनी मात्र
भर पावसात फिरफिर !

ऒला पाऊस , ऒला आसमंत ऒला अन्‍ हा वारा ,
थांबूनि घटकाभर मन म्हणे घेवूत घुटके आले चहाचे जरा

बसमधून उतरली
पाहून थेंबे थबकली
थबकली ती रजतचंद्रा,
छत्री उघडतांनाही करीतसे,
किती हो त्रासिक मुद्रा


खड्डे हॊऊनि रस्त्यांत
झाला ट्रॅफीक जॅम सारा
कडेस थांबूनि खातसे कणीस भाजके
तोच निसर्ग रसिक खरा !


पाऊस असा हा फुलवी,निराळी पुष्प अन‍ लता
तृप्त करीतो क्षणार्धात तप्त ही धरणी माता


म्हणे ढगांसि लाविन टाचणी
घेवूनि आकाशी उंच झेप
पुरे ही तुझी थेरे मानवा
निसर्गा नको तुझा हस्तक्षेप !पराग खैरनार,नाशिक
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com
parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com

Friday, July 11, 2008

एक पाढा पावसाचा !

“ एक पाढा पावसाचा ! ”


पाऊस एके पाऊस ,
थांब प्रिये नको जाऊस !
पाऊस दुणे छत्री,
खिश्याला लागली कात्री
पाऊस त्रिक खड्डे,
पहा ते,पडलेत दोन बुढ्ढे !
पाऊस चोक रेनकोट,
पडता थोडे उन्हं , सारे वातावरण कोमट
पाऊस पंचे डबके,
कपडे घालावे रंगानं मळके
पाऊस सकुम चिख्खल ,
अनवाणी पायात मातीची चप्पल !
पाऊस एक सहल ,
थोडा अनुभवावा बदल
पाऊस साते भजी,
खावीत गरम अन‍ ताजी
पाऊस ऋतू हिरवा,
रम्य तो सुखद गारवा
पाऊस आठे लोकलला उशीर,
बोलणे ऐकून साहेबाचे, झालेत कान बधीर
पाऊस नवे खोळंबा ,
आणि “कामंआटपत नाहीत” म्हणून घरून नुसत्या बोंबा
पाऊस दाहे ‘गटारी अमावस्या” ,
शौकीन म्हणती,“ घ्या पिऊन एकदाची आज,
नंतर आहे चार महीने तपस्या ! ”पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

आधुनिक शुभंकरोति

“ आधुनिक शुभंकरोति ”

एखादा माळकरी मनुष्यानं अचानक दारूच्या आहारी जावं तद्वत्‍ आजची तरूण पिढी ‘मोबाईल’ या यंत्राच्या आहारी गेलेली आहे.आताशा पाळण्यातली तान्हुली बाळेही खेळण्यांपेक्षा मोबाईल आपल्या हाती द्यावा यासाठी भोकाड पसरतांना दिसतात.
कर्ण-कर्कश्य रिंगटोन्स ,भरमसाठ बिलं , कंपन्यांचे निरनिराळे प्लॅन्स असंख्य नवे मॉडेल्स ,रंगाने एकजात काळे पण प्रत्येक कंपनीचे वेगळे असे चार्जर ,ह्या सगळ्या ,मोबाईल खरेदी केल्यास ‘फ्री’ मिळतात.
आजच्या जगातून मानसिक शांती नाहीशी होण्याचे मोबाईल हे एक कारण आहे.
या सर्वांसाठी ही आधुनिक शुभंकरोति !

॥ मोबाईलं करोति एसेमेसं ॥
॥ फ्रीकॉल,स्लीम मॉडेल ,रिंगटोनसंपदा ॥
॥ सॉफ्टवेअर व्हायरस विनाशाय ॥
॥ चार्जर ज्योति नमस्तुते ॥

॥ हॅन्डसेट ठेवला हॉलपाशी ॥
॥ आवाज निनादे सा-या घरांशी ॥
॥ शांतीची प्रार्थना ही माझी ॥
॥ सर्व मोबाईलवेड्यांशी ॥पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

Sunday, June 15, 2008

“सांग सांग भोलानाथ ”(हास्य बिडंबन)

सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ?
विप्रो सिफी इन्फोसिसचे भाव वाढूनी , प्रॉफीट होईल काय ?
सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ? ॥ध्रु.॥

भोलानाथ ,भोलानाथ,
आम्हाला हवा असा एक शेअर,
भाव असा वाढावा की सारा नोटांचाच बाजार,
सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ? ॥१॥

भोलानाथ ,भोलानाथ,
नकोत आम्हाला रिलायन्स पॉवर ,
बॅंका अन सोसायट्यांचं कर्जं काढूनही
अपेक्षांचे कोसळलेत टॉवर
सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ? ॥२॥

घरादारात सगळीकडे आता आहे हीच एक भाषा ,
“किती नं चढला ,किती नं पडला ,काय राव हा तमाशा ? ॥३॥

सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ?
शेअर्समध्ये कर्जाऊ पैसे घालूनी कुणी कधी अमीर होवू शकेल काय ? ॥४॥

भोलानाथ ,भोलानाथ,
एकतर डिमॅटची ती गडबड ,
हा घेऊ ,तो घेऊ म्हणता उडते चांगलीच तारांबळ ॥५॥

सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ?
हर्षदसारखा एखादा बिगबुल येऊनी ,आम्हालाही गंडवेल काय ? ॥५॥

भोलानाथ ,भोलानाथ,
फॉर्म भरतांना इनवेस्टमेंटचा ,इथे सतराच लफडे,
इथे सह्या ,तिथे सह्या करता ,
पडतात बोटांचेच तुकडे ॥६॥

सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ?
पैसे कमवू म्हणून झोपी जाता ,पैश्यांचा पाऊस स्वप्नापुरताच दिसेल काय ?
सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ? ॥७॥

फॅमिली लाइफ नाहीच आम्हांसी,
नुसते स्टॉकब्रोकरलाच फोन,
बायकोही पाही संशयी नजरेने ,
आताशा बदललाय तिचा द्रुष्टीकोन ॥८॥

सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ?
थेंबभरही घाम न गाळता,कधी कुणाला ,ही लॉटरी लागेल काय ? ॥९॥

भोलानाथ ,भोलानाथ,
तेजीमंदीच्या गप्पा आता सगळीकडेच सुरू,
भजनी मंडळातल्या काकूही म्हणतात,“ किती वाल्लेत लिलायन्सचे जला बघ तर बाई पारू .” ॥१०॥

सांग सांग भोलानाथ ,मार्केट चढेल काय ?
एनएसई,बीएसई,निफ्टी यांचेच सारे जंजाळ ,
असं वाटतं डीम होते क्काय लाइट आमची,
चर्चा पैशाच्या फक्त ,ऐकून सर्व काळ ! ॥११॥

सांग सांग भोलानाथ ,सेंसेक्स वाढेल काय ?
पैश्यांचा पाऊस पडून शेअर मार्केटात,
आम्हाला भिजवेल काय ?


पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit me @ : http://www.hasyakavitaa.blogspot.com/

Saturday, March 29, 2008

"डॉली ही चावरी "

नेहमी लोखंडी गेट मध्ये कैद असणारी ‘डॉली’ नावाची चाव चाव चावणारी कुत्री. ही समोरच्या बंगल्यातल्या ‘टॉमी’ नावाच्या कुत्र्याच्या प्रेमात पडली आणि त्याला मुक्त भेटता येत नसल्याने ती आणखीनच चिडखोर बनली.

(चाल : राधा ही बावरी )
रंगात पांढरा रंग,येता पाहूणा कुणी ही गुरगुरते ऽ ऽ ऽ ,
वळवून मान भूंकून छान ,
पळवूनी तयाला लाविते ,
या हिंस्त्र स्वरांचे हल्ले करूनी
भूंक भूंकूनी होई,
डॉली ही चावरी ऽ ऽ ऽ ,
टॉमी ऽ ऽ ची ,
डॉली ही चावरी ऽ ऽ ऽ ॥धृ ॥

बघताच त्याला दूर कुठून ऽ ऽ ऽ ,
शेपूट हलवी ही उठून ऽ ऽ ऽ ,
हे फाटक मधले कुणी बांधिले ?
ती त्यातून निसटू पाही ,

लोखंडी या जाळीमधूनि ,
मुंडकं ठेवूनी पाही ऽ ऽ ऽ ,
डॉली ही चावरी ऽ ऽ ऽ ,
टॉमी ऽ ऽ ची ,
डॉली ही चावरी ऽ ऽ ऽ ॥१ ॥
पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

Saturday, March 15, 2008

“थोडं हसू या -१”

एक शेजारी दुस-याला : “अहो टीव्ही दिसतोय का ?”
दुसरा : “हो .दिसतोय की !”
पहीला : “नाही म्हणजे केबल दिसत्येय का ? ”
दुसरा : “केबल कशी दिसेल ? ती तर टीव्हीच्या मागून असते ना ? ”
-------------------------------------------------------------------------------------------------
(एक बिगडे बाप का बेटा रस्त्याने गाणं म्हणत चाललेला असतो .)
बिगडे बाप का बेटा :“हा सुट मेरे बापका,
हा बुट मेरे बापका ,
ही गाडी मेरे बापकी ,
हा बंगला मेरे बापका !"
( त्याच वेळी रस्त्याने एक खडूस म्हातारा जात होता .)
वृद्ध माणूस : “ अरे पण टाळक्यात अक्कल तरी स्वत:ची आहे का ? ”
-------------------------------------------------------------------------------------------------कंपनीत आजूबाजूला खूप ध्वनीप्रदूषण असतं म्हणून सदूनं क्लर्कला सांगितलं ,“ माझ्याकरता ‘ इअर प्लग ’ घेऊन ये .”
त्यांवर अर्थ न कळून क्लर्क म्हणाला,“ का ? ऐकू येत नै क्काय सदूभाऊ तुम्हाला ?”
-------------------------------------------------------------------------------------------------“काय नाव हो तुमच्या मुलाचं ? ”
“आशिर्वाद ! ”
“अहो ,मुलाचं नाव सांगताय का एखादया सिरीयलचं ?”
-------------------------------------------------------------------------------------------------आजकाल कार्यक्रमात निवेदक निवेदन करता करता आगाऊपणाच जास्त करतात .
एका कार्यक्रमात निवेदकाने स्पर्धक मुलीला नांव विचारलं .
तिने उत्तर दिलं ,“ कावेरी !”
त्याने कोटी केली ,“ अगदी आंघोळ केल्यासारखं वाटलं !”
तीही काही कमी नव्हती. ती म्हणाली,“हो, हो ,खूप ‘हे’ आहात हो तुम्ही !
माझं नाव ‘वैष्णवी’,‘रेणुका’ असं काही असतं तर पायाच पडले असतात की जसे माझ्या ! ”
-------------------------------------------------------------------------------------------------
“नांव काय हो तुमचं ?”
“देवांग ! ”
“जळगावच्ये का ?”
“कमाल आहे . कसं ओळखलं ?”
“शिम्पलहे ! नावातंच ‘वांगं’ हाय की तुमच्या !"
-------------------------------------------------------------------------------------------------जितेंद्र जोशींना एकदा एक युवतीचा फोन आला.
ती : “ हाय जि‍ ऽ ऽ तू ! खूप छान काम केलंयस तू ‘सही रे सही ’मध्ये ! ”
(तिचा फोन कट झाला . . .)
इकडे जितू अवाक !
जितू : “ अहो पण ऐका तरी , ‘सही रे सही ’मध्ये मी कुठे होतो ? "
-------------------------------------------------------------------------------------------------नायगांवकर सरांना एक माणूस बसमध्ये भेटला .तो बराच वेळ त्यांच्या मिशीकडे लक्ष देऊन पाहात होता.
एकाएकी त्याला काहीतरी आठवलं .
धाडस करून त्याने विचारलं ,“ काहो ? ते ‘हास्य सम्राट’ वाले ते तुम्हीच का ?
त्यांनी उत्तर दिलं,“ हो !”
त्याचा पुढचा प्रश्न ,“ मं कुठल्या चायनलवर आस्तो तो पोग्राम ?”
त्यांनी उत्तर दिलं.
त्यावर त्याचा पुढचा प्रश्न,“ म्हंज्ये मकरंद अनासपुरे तुम्हीच का ? ”
-------------------------------------------------------------------------------------------------
“ आडनांव सांगा तुमचं . ”
“अत्तरदे ! ”
“अहो हे नगरपालीका ऑफीस आहे ,अत्तर - उदबत्तीचं दुकान नाय !”
-------------------------------------------------------------------------------------------------वडलांच्या हातून रिमोट काढून घेऊन बाळ्याने त्याच्या आवडत्या ‘पॉपकॉर्न न्यूज’चे चॅनेल लावले.
खाली हेडलाइन्स येत होत्या . . .
बाबा : “बाळ्या ,लाव पाहू ते आस्था चॅनेल ”
(बाळ्या फिल्मी बातम्यांमध्ये अडकलेला . . )
बाळ्या : “ बाबा ,बाबा ,हेडलाइन बघा . . . सैफने करीनाला लॅपटॉप दिला ”
बाबा :“ अरे ते ठिके पण लॅपटॉप चालवायला लागते ती अक्कल देवाने दिलीय का ?”
-------------------------------------------------------------------------------------------------
एका म्हाता-या माणसाने कॉम्प्यूटर विकत घेतला .तो नीट शिकला ही नव्हता. कॉम्प्यूटर खरेदीच्या दुस-याच दिवशी त्याने
कॉम्प्यूटर विक्रेत्याला फोन केला व C.P.U.ऑन करूनही कॉम्प्यूटर चालू होत नसल्याचे सांगितले.
पुन्हा “माझा सगळा डेटा लॉस झाला असेल की काय ?” अशी काळजी ही व्यक्त केली.
विक्रेता म्हणाला,“ साहेब ,काळजी करू नका ,मी आमचा माणूस पाठवतो .”
थोड्या वेळाने त्याचा माणूस आला .त्याने पीसी चेक केला.तेवढ्यात त्याला मालकाचा फोन आला .
त्याचा साहेब,“ काय रे काय प्रॉब्लेम आहे ?”
तो :“ साहेब ,प्रॉब्लेम काही नव्हता.साहेबांनी मॉनिटरचं स्वीच ‘ऑफ ’ ठेवलं होतं.”
-------------------------------------------------------------------------------------------------
पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

“थोडं हसू या -२”

‘सारेगमप’ मध्ये अंतीम दहा स्पर्धकांमधली कु.फटकळे ही जरा उद्धटच होती पण तिला गाणं चांगलं गाता यायचं.
त्या दिवशी विशेष एपिसोड होता .गाणं म्हणायला ती मंचावर गेली.
निवेदिका पल्लवी जोशी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं हिंदी बोलावं तसं मराठी बोलत होत्या . . .
पल्लवी जोशी : “तुला माहीतीये ? खुप सारे लोक तुला पाहतायत !”
कु.फटकळे : “हे तू वेगळं का सांगत्येयस ? मी आंधळी आहे का ? ”
हा सीन एडिटींग मध्ये मात्र कट केला गेला .
-------------------------------------------------------------------------------------------------
दोन तबलजींची जुगलबंदी चालू असते .नीट ऐकलं तर वाटतं जसे घाटावर दोन धोबी कपडे धूवायला आले आहेत.
त्यातला एक आळशी आहे तर एक उत्साही .
पहीला (आळशी असणारा )म्हणतो : “ धुणं धुवून टाकूक्का नको ?
धुवून टाकूक्का नको ?
धुवून टाकूक्का नको ?”
यांवर दुसरा (उत्साही असणारा) म्हणतो : “ धुण्टाक ,धुण्टाक ,धुण्टाक ,धुण्टाक !”
-------------------------------------------------------------------------------------------------
मराठी चित्रपट बनवतांना हिंदीची कॉपी केली जाते असं म्हणतात पण हे उदाहरण आहे एका हिंदी चित्रपटाचं जिथे मराठीतलं अख्खं एक गाणं उचललेलं आहे .काही वर्षांपूर्वी स्मिता तळवलकरांचा ‘चौकट राजा’ हा चित्रपट आला होता.
त्यांत “मी असा कसा, असा कसा वेगळा ऽ ऽ ळा ऽ ऽ ळा ”हे गाणे होते .
२००३ साली ’लक्ष्य’ हा हिंदी चित्रपट आला तेव्हा आशय तोच ठेवून फक्त शब्द बदलून गाणं हिंदी केलं गेलं अन ते चक्क फेमस झालं.गाणं होतं ,“ मैं ऐसा क्यू हूँ ? मैं ऐसा क्यूँ हूँ ?”
-------------------------------------------------------------------------------------------------जर भाषाकारांनी ठरवलं की ‘प्रेम’ या शब्दाऐवजी ‘शेण’ हा शब्द वापरला जावा आणि ‘शेण’ या शब्दाच्या जागी ‘प्रेम’ हा शब्द वापरला जावा (शक्य आहे ! आता इथून पुढे काय काय होईल सांगता येत नाही .) तर काय होईल ?
मराठी गाणं कसं असेल ? ‘‘शेणा ऽ ऽ ऽ ला उपमा ना ऽ ऽ ही ,हे देवाघरचे देणे !”
चित्रपटांची नावं कशी असतील ? ‘ शेण करूया खुल्लमखुल्ला ! ’
प्रेमाची कबुली कशी दिली जाईल ? प्रेमीक प्रेमाचा इजहार कसा करतील ?
एका बागेत व्यवस्थीत कॉर्नर पाहून प्रियकर -प्रेयसी बसलेत.
प्रियकर म्हणतोय :“ प्रिये माझं तुझ्यावर खूप खूप शेण आहे !”

‘शेण’ या शब्दाऐवजी ‘प्रेम’ हा शब्द वापरला तर काय होईल ?
“ अहॊ पाटलीणबाई ,हयेप्पा ! तुमची म्हैस आमच्या अंगणात किती प्रेम करून गेलीये ”
-------------------------------------------------------------------------------------------------
जर ‘मन ’ या शब्दाऐवजी ‘घण’ (हातोडा) हा शब्द वापरला तर गाणी कशी असतील ?
“ घणाच्या धुंदीत ,लहरीत ये ऽ ऽ ना ,सखे गं साजणी ,ये ऽ ऽ ना.”
“ नाते जुळले घणाशी घणाचे .”
मराठी अल्बमची नावं कशी असतील ? ‘वेड्या घणा .’
-------------------------------------------------------------------------------------------------विविध कार्यालयांमध्ये ,कारखान्यांमध्ये प्रवेशद्वाराशी सूचना फलक असतो .तिथे एकदा एक सूचना लागली की ,पाहायला बरीच गर्दी होते.तीच सूचना महीनाभर नाहीतर पंधरा दिवसतरी तिथे असणार असते पण नंतर जाऊन वाचू ,असे सामंजस्य मात्र कुणी दाखवत नाही.
कधी - कधी सूचना तीच असते पण लोक ऊगीच गर्दी करतात.एकेकाची तिथे ऊभे राहण्याची कारणं वेगवेगळी असतात.
अश्याच ठिकाणचा एक प्रसंग !
एक सेवानिवृत्तीला आलेला वृद्ध मनुष्य खूप वेळ त्या नोटीस बोर्डाकडे पाहात उभा होता.त्याला तिथे उभा पाहून पाहीलेलीच नोटीस पाहायला गर्दी जमते.मोठ्या जनसंख्येमुळे कोणालाच नीट वाचता येत नव्हतं.
एवढ्यांत त्याला उभा पाहून त्याचा मित्र त्याच्याजवळ आला .
मित्राने विचारलं,"काय बापू ? येवढा काय वाचितो ? आक्षंरं उडून जातील बरं ? मायला दॉन वळींची नॉटीस वाच्यायले साल्या तुले धा मिंटं कश्ये लागता ब्ये ? अन्‍ तुला तं चष्म्याशिवाय वाचता नै येत मंग त्वा इढं काय कर्तो ? "
यावर तो मनुष्य उत्तरला,“ टाइमपास !”
-------------------------------------------------------------------------------------------------सेवानिवृत्तीच्या दिवशी दोन कर्मचारी वरीष्ठ साहेबांना भेटायला गेले.त्यातला एक जरा फटकळ होता अन्‍ त्यात साहेब सरदार !
तो : “ क्या साहेब ,हमकॊ जल्दी निकालके दे रहे ,याँहाशे ?”
सरदार असला तरी तो त्याचा साहेब होता ,असं काहीही बरं तो ऐकून घेणार होता !
साहेब :“ अरे जल्दी तो तुम्हे ही थी ।”
( तो जागीच अवाक्‍ ! )
तो :“ क्या साब ?”
साहेब:“ अरे जल्दी तो तुम्हे थी जो जल्दी जनम ले लिया ,थोडा रूकके इंतजार करते,तो हम तुम दोनो साथ साथ दुनिया में आते थे और आराम से रिटायर्ड होते थे । साला आने की भी जल्दी जाने की भी जल्दी ,अब जा भाग ! ”
-------------------------------------------------------------------------------------------------कधी कधी बोलता बोलता slip of tounge मुळे विनोद निर्मिती होते.याचे हे उदाहरण !
एकदा नोटिस बोर्डवर सुचना वाचत होतो .एका वरीष्ठांचा सेवानिवृत्तीचा समारंभ एका हॉटेलात ठरवला गेला होता ,ते ठिकाण काही कारणास्तव बदलले गेले होते ,तीच ती सूचना होती.शिर्षक होतं ‘Change in Venue of farewell party !'.
आमचे एक वरीष्ठ म्हणाले,“ अहो खैरनार , जरा पहा तर बरं ,`FUNERAL PARTY' कुठे आहे ते !”
-------------------------------------------------------------------------------------------------होर्डींगवर Thums Up ची जाहीरात लागली होती : अक्षय कुमार म्हणतोय, “ थम्स अप पिणार ? माझ्याबरोबर निन्जा (हायस्पीडची एक मोटर सायकल ) चालवणार ?”
सायकलवरून येणा-या एका खेडूत त्या जाहीरातीकडे पाहून म्हणाला,“ आरे बोळक्या तोंडाच्या,थम्फफ प्यायाले पैसे आस्ते तं येमेटीत पेट्रोल नस्तं का टाकलं ,सायकलीवर टांगा मारू मारू काह्याले तंगाडलो आस्तो लांब लांब ! ”
-------------------------------------------------------------------------------------------------सध्या आरोग्याबदद्‍ल consciousness वाढतेय.Nail polish खरीदायला गेलेल्या सदूने दुकानदाराला विचारले ,“काय हो ही edible आहे ना ? विषारी तर नाही ना ?”
दुकानदारानं विचारलं,“ का ? ”
सदूने उत्तर दिलं ,“ नै ,त्याचं काय आहे ,आमच्या ‘हि’ला नखं खाण्याची सवय आहे , म्हणून विचारून घेतलं ! ”
-------------------------------------------------------------------------------------------------पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

''अभ्यास कर !''

सॅटेलाईट चॅनेल्समुळे लहान मुलं खेळायला जात नाहीत ,अभ्यासाला टाळाटाळ करतात ,निरूत्साही बनतात.
एका जागरूक आईने मुलांच्या चांगल्या सवयींसाठी हे गीत लिहीलंय.

( चाल: "Let's te music play !" )
आई :“ रात्र रात्र टिव्ही तू बघतेस ,
रोज कार्टून चॅनेल हा लावतेस,
करत नाहीस तू अभ्यास ,
सदा तुला कार्टूनचा ध्यास !
उठ ! पळ ! चल अभ्यास कर ! ॥ध्रु॥ ”

(असं म्हणून आईने टिव्ही ऑफ केला )

मुलगी : “ ए ! आई ! चालू राहू दे टिव्ही !
ए ! आई ! चालू राहू दे टिव्ही ! " ॥१॥

आई : “ उठ ! पळ ! चल अभ्यास कर !
उठ ! पळ ! चल अभ्यास कर !
काय तब्येत झाली आहे पाहा ,
(उपहासाने) तू अशीच बारीक राहा !
काय तब्येत झाली आहे पाहा ,
तू अशीच बारीक राहा !
कसं शरीर तुझं होईल बळकट ?
असल्यावर अशी तू आळसट !
कसं शरीर तुझं होईल बळकट ?
असल्यावर अशी तू आळसट !
उठ ! पळ ! चल जा अभ्यास कर !
उठ ! पळ ! चल जा अभ्यास कर ! ॥२॥

जाऊन मैदानात खेळ ,
जाऊन मैदानात खेळ ,
नको घालवूस असा तुझा वेळ ,
उठ ! पळ ! नको बसू टिव्हीसमोर ! ”॥३॥

पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

''बोका''

एकदा टॉम आणि जेरी जोडीने ‘मर्डर’ पिक्चर पाहायला गेले.पॉपकॉर्न खाण्यावरून त्यांचं भांडण झालं. टॉम बिळात लपला व समुहातल्या बाकी उंदरांना तो जेरी बद्दल सांगू लागला . . . . .

(चाल :दिल को हजार बार रोका . . . )

हो ऽ ऽ हा हा हा ऽ ऽ , हो ऽ ऽ हा हा हा ऽ ऽ,
बिळाच्या तोंडापाशी ऽ ऽ आला आहे बोका ,
पटकन जाऊन कोणीतरी त्याला ठोका,
जीव हा वाचवा ,
बोक्याला कटवा,
नाही ऽ ऽ तर होईल प्राणांशी तुमच्या धो ऽ ऽ का ! ॥१॥

आ ऽ ऽ ऽ आ ऽ ऽ ऽ ,
वाचवा याच्यापासून स्वत:ला ,
खेळतो हा गनिमी कावा ऽ ऽ ,
कोणितरी त्याच्या दुधाच्या वाटीत ,विष घा ऽ ऽ लून ठेवा !
बिळाच्या तोंडापाशी ऽ ऽ आला आहे बोका . ॥२॥
पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

''दारूमुक्ती''

व्यसनाधीन झालेल्या गावातल्या तरूणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी दारूमुक्ती प्रबोधन मंचाचे कार्यकर्ते आले होते।दारूमुक्तीचा सल्ला त्यांना सहजपणे गळी उतरवणे आवश्यक होते.अश्यावेळी त्यांनी तो सल्ला असा दिला . . . .

(चाल : जादू तेरी नजर )

दा ऽ ऽ ऽ रू तू बंद कर , दारू तू बंद कर ,
कधी हँगओव्हर ,
कधी करपट ढेकर ,
दारूमुळेच आहेत हे ऽ ऽ ऽ विकार ऽ ऽ ऽ ॥ध्रु॥

कधी रम पितोस ,
कधी व्होडका घेतोस,
कधी मारतोस नुसतीच बियर , दारू ऽ ऽ ऽ ॥१॥

कधी सोड्याबरोबर ,
कधी पाण्याबरोबर ,
कधी नुसतीच पिऊन देतोस ढेकर , दारू ऽ ऽ ऽ ॥२॥

कधी व्हिस्की ,
कधी ब्रँडी ,
जोडी ऽ ऽ ला मटन हंडी ,
कारणं तुला पुष्कळ ! दारू ऽ ऽ ऽ ॥३॥

येत नाही ऽ ऽ ऽ कसा तुला कंटाळा ऽ ऽ ऽ ?
करून पैश्यांचा हा असा चुराडा ,
हे बंद कर , हे बंद कर ,
जीवन होईल तुझे सुखकर ,दारू ऽ ऽ ऽ ॥४॥

पितोस अधाशीपणे पेगवर पेग तू,
सापळा हाडांचा होत आहेस तू ,
संपवतोस कश्याला स्वत:चं आयुष्य ?
विसरलास ? तू आहेस देशाचं या भविष्य !
नको करू नकार ,
तू दे होकार ,
नकोत असले पुन्हा प्रकार , दारू ऽ ऽ ऽ ॥५॥

पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

`` पाळणा ''

नवरात्रीतल्या जत्रेत रहाट पाळणे असतात.अश्याच एका रहाटपाळण्यात सहज गंमत म्हणून एक गीतकार बसला.दोन राऊंड झाले.तिस-या राऊंडला लोडशेडींगमुळे लाईटच गेली. तो बिचारा बी.पी.पेशंट.सहज म्हणून बसला अन आता अडकला. तेव्हा त्याने आपल्या भावना अश्या व्यक्त केल्या . . .
(चाल :जग सुना सुना लागे . . . )
कुणीतरी खाली घ्या हा पाळणा ऽ ऽ
मला भिती खूप वाटे ,
मला भिती खूप वाटे रे ! ॥ध्रु॥

कोणी ऽ ऽ ऽ मदतीला ऽ ऽ बो ऽ ऽ लवा
पाळणा हा एकदाचा फिरवा ऽ ऽ
मला यायला लागली आहे भोवळ ,
कुणीतरी खाली . . . . ॥१॥

लोडशेडींग ऽ ऽ ही का ऽ ऽ हो ऽ ऽ ते ?
का होते ?
जग हे ऽ ऽ ऽ ,जिथल्या तिथे थांबते ,
का थांबते ?
बघा अडकल्या पोरी ,क्लासला आलेल्या ऽ ऽ ऽ ! ॥२॥

हे असेच नेहमी का हो ऽ ऽ ते ?
वीज ही पुन्हा पुन्हा का ऽ ऽ जाते ऽ ऽ ?
बघा रडायला लागली तान्हुली ,
आई तिची आहे खाली !
कुणीतरी खाली . . . . . ॥३॥


पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

Saturday, March 8, 2008

" ताक दे "

खिचडी अन कढी हा बेत मध्यमवर्गीय महाराष्ट्रायनांमध्ये खूप लोकप्रिय आहे.दसरा - दिवाळी या सणांनंतर काहीतरी साधंसं खाण्यासाठी मन आतूरते.असाच भाव या आमच्या गाण्यातून व्यक्त झाला आहे.
(चाल : चक दे इंडीया )
खूप दिवसा ऽ ऽ तुण आला ऽ ऽ हा खिचडीचा बेत ऽ ऽ
आता तू दे ऽ ऽ (कोरस : ऑ ऑ ऑ ऑ )
चल आता ,दे लवकर झालाय ,आधीच उशीर ऽ ऽ
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ ,
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ ,
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ ,
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ .


पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

मनोमनी(संपूर्ण विनोदी लेख)

काळ कितीही बदलला असला तरी या नेट युगात काही गोष्टी अगदी अव्याहत चालू आहेत.उपवर मुलीला दाखवणे हा असाच एक मनोरंजक कार्यक्रम! असं म्हणतात की नाती जुळण्यापेक्षा मनं जुळणं महत्वाचं!पण आजच्याकरीअर वूमनला मात्र याप्रसंगी अनेक बावळट नांना सामोरे जावे लागते. वरकरणी कोणी काहीही दाखवत असलं तरी क्षणोक्षणीएकेकाच्या मनातल्या चोरकप्प्यातविविध विचार तरंग उठत असतात. सुरूवात होते ती थेट मुलाकडच्यांच्या आगमनापासून. . .
मुलीचे वडील मुलाकडच्यांनारिसिव्ह करायला प्रवेशद्वारापाशी जातात.
मुलीचे वडील:या या.पत्ता लगेच मिळाला ना? काही त्रास तर नाही ना झाला ?
मनोमनी: पैसे वाचवायचे म्हणून फोन केला नाही हे आलंच लक्षात पण कमीतकमी मीस कॉल तर द्यायचाकी नाही . . .कंजूष लेकाचे!
मुलाचे वडील: . . नाही ,नाही.. . .पत्ता लगेचचमिळाला.
मनोमनी: किती सोपा दिला होतापत्ता यांनी. . .काय बरं दिला होता ? स्टॉपपासून चालत शिवाजी पुतळ्यापर्यंतयायचे मग एक पार्क दिसेल.त्यात दोन झोपाळे दिसतील. . . पिवळा आणि लाल .त्यांतल्य लाल रंगाच्या झोपाळ्यावर हातभर उंच गेल्यावर जीगॅलरी दिसेल तोच आमचा फ्लॅट.असा विचित्र पत्तादिला होता या शत मुर्खांनी! . . .मी म्हणतो अरे दिलात तो दिलात पण पावसामुळेपार्कात अस्सा चिख्खल झालाय की …त्यांवर बसायचं म्हणजेउत्तर ध्रुवावर जाऊन शेकोटी करण्याइतकं अवघड आहे. काय हा विक्षीप्तपणा?
सर्व स्थानापन्न होतातमग सुरुहोतात तेच आजपर्यंत अनेकदा विचारले गेलेले रटाळ प्रश्नं अन त्यांची तीचअनेकदा दिली गेलेलीउत्तरं)
मुलीचा भाऊ(मुलाला):आपण काय करता?
मनोमनी: चहा पोह्यांचे कार्यक्रम अटेन्ड करण्याव्यतिरिक्त !
(मुलगा काहीतरी उत्तर देतो एवढ्यांत आतून मुलगीपोहे अन मिठाई आणून टेबलावर ठेवून आंत निघून जाते.तिच्याकडे अन ती गेली त्या दिशेस मुलगा अन त्याचे आई वडील पाण्यासाठी तळ्यावर आलेल्या सावजाकडे वाघ जसा रोखून बघतो तसं बघत असतात.इतकं की त्यांचे चर्चेचे विषयही तिथेच थांबलेले असतात.)
मुलीची आई सर्वांना:घ्या घ्या! हे पोहे अन मिठाई आमच्या मुलीने स्वत: बनवली आहे.
मनोमनी:खा खा! खा मेल्यांनो फुकटाचं ! उरवू नका मात्र ताटलीत नाहीतर नाक दाबून घश्यांत घालीन एकेकाच्या !आमचंच खा अन मग सॊनं किती देणार ,नाहीतर हुंडा किती देणार यावर अडून बसा.
(मुलाची आई मुलीने काढलेलं चित्रं पहाते.चित्रावर नांव घातलंय खाली पण सहज विचारायला इतर प्रश्नंच जणू सापडत नाहीत)
मुलाची आई: पेंटींग मुलीनं स्वत: केलंय वाटतं.माझं ही काढता येईल काहो असलं एखादं चित्रं ?
मनोमनी: सर्वांच्या तब्येती बाळसेदार दिसतायत,सधन कुटूंब दिसतंय.आमच्या टकल्याला सांगून ठेवावं लागेल की बैठकीत बिलकुल कमी करू नका .माझी खूप दिवसां ची ईच्छा होती ‘तनिष्क’हिऱ्याच्याअंगठीची .आता पूर्ण होईलसं दिसतंय!
मुलीची आई : हो हो तिनंच काढलंय हे पेंटींग !
मनोमनी: अगं बये ! ते व्यक्तीचित्रंय माझं अन तुमचं काढलं तर लोक विचारतील माझ्या पोरीला - चित्रं रंगवून होईपर्यंत ‘हत्तीण’ एकाच जागी कशी बसून राहीलीईतका वेळ ?
(मग मुलीला बोलावतात.)
मुलाचे वडील : मुली तुझं नांव सांग .
(मुलगी नांव सांगते ,पण मनोमनी काही तरी वेगळंच!)
मनोमनी :एवढाही कॉमनसेन्स नाही ?या घराला माझंच नांव दिलंय की !
मुलगा :आपण कुठपर्यंत शिकल्या आहात ?
(मुलगी उत्तर देते.)
मनोमनी:डोक्यांत चप्पल घालू का ? ही माहीती तर आधीच आम्ही दिली होती ना ,मग ही उलट तपासणी पुन्हा कशाला ?
(मुलाचे वडील मुलीच्या भावाकडे पहातात)
मुलाचे वडील : मुलाचं वय काय तुमच्या ?
मुलीचे वडील उत्तर देतात: ८० चा आहे तो.
मुलाचे वडील : क्काय ?
मुलीचे वडील : म्हणजे मला म्हणायचं होतं की १९८० सालचा जन्म आहे त्याचा.
(दरम्यान मुलाचा भाऊ येतो .तो वेगळ्या मार्गाने आला असल्याने त्याचा एक पाय चिखलात बरबटलेला आहे ,म्हणून तो घरात यायला संकोच करत आहे .)
मुलीचा भाऊ(मनाविरूदध): अहो या ना आंत .असू द्यांत बूट तसेच.या .या.
मनोमनी: आता चिखलानं सारं घर खराब होईल पण त्याचं तुम्हाला काय ? हे तर आपल्या मालकीचं घर अन आम्ही आपले नोकर.सालं! मुलाबरोबर यांचंही सारं खपवून घ्यावं लागतंविनाकारण.यांना आणायची गरजच काय ?
(आता प्रश्नोत्तरांनारंगत येते.)
मुलाचे वडील:मुली तुला नॉन व्हेज बनवता येतं का ?
(मुलगी होकार देते)
मुलाचे वडील: तू आठ दहा लोकांसाठी चा ऽ ऽ ऽ यनीज बनवु शकशील ?
मुलगी: हो बनवू शकेन.
मनोमनी: तिथे काय चायनीजचा गाडा लावायचाय ?
(पुढच्या प्रश्नांना मुलगी होकारार्थी उतार देते पण मनांत वेगळंच चाललेलं असतं)
मुलाची आई: तू गाऊ शकतेस ?
मुलगी(मनोमनी):गाणं ऐकून पळून जाणार नसाल तर जरूर गाते.
मुलाची आई: तुझ्या काही अपेक्षा असल्यांस सांग.
मुलगी(मनोमनी) :अनेक आहेत .स्वयंपाक शिजवायचा तुम्ही - मी वाढेन ,भांडी घासायची तुम्ही - मी धुवेन,दर महीन्याचा यांचा पगार मी माझ्याकडेजमा करून घेईन - तुमचा खर्च तुम्ही करायचा,हे सगळं जर व्यवस्थित तुम्हाला जमलं तर इन फ्युचर , गॅरंटीड ऍडिशन म्हणून बलसंगोपन ही तुमच्याकडेच सोपवू.
(यानंतर सरबत दिलं जातं.)
मुलाचा भाऊ:सरबत छान आहे .गुलाबाचं वाटतं.
मुलीचा भाऊ(मनोमनी): अरे ,दिडशे रुपये लीटरची‘रूह अफजा’ची बाटली आहे आमच्याकडे ! पिला नसशील बेट्या उभ्या जन्मांत -असं सरबत!
मुलाची आई( शेजारी बसलेल्या स्त्री कडे निर्देश करून मुलीच्या आईला): ह्या आमच्या नणंद बाई बरं का !
मुलीची आई : बरं बरं.
मनोमनी :अजून एका फुकट्याची भर !
(यानंतर निरोप समारंभ!)
मुलाचेआई वडील : बराय येतो आम्ही.कळवतो नंतर फोन करून !
मुलीचे आई वडील : हो हो जरूर. यापुन्हा!
मनोमनी : आमच्या मानगुटीवर बसायला.
(गोड शेवट- मुलीच्या घरी चर्चा.)
काही असो रानरेड्याच्या चेहऱ्याची जरी ही माणसं मख्खअसली तरी मनानं चांगली वाटतात.बघूया काय होतंय पुढे!
(तात्पर्य: आपण मुलगी बघावयांस जातांना हे सगळं लक्षात ठेवून मग प्रश्नं विचारावेत.)
पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

. . . माला बी मुंबैला -हाऊ द्या की रं ! (विनोदी लेख)

. . . माला बी मुंबैला -हाऊ द्या की रं ! (विनोदी लेख)
आवडती भैन आक्काला ,
मुंबैहून शित्याचा नमस्कार !
जसा गावाकडनं हिकडं नौक्री कर्तातसं पत्रं ल्ह्यायलाच जम्लं नै बघ.यक तं नवं काम .लैच यंगेज हूतो.
तुला सांगतो आक्क्ये , ईकडं पत्रं बित्रंकुणीबी ल्यित नै.सर्वे कानात काळ्या नळ्या टाकीत्येत आन खिश्यातल्या मॉबाइलवर बोलत फिर्तेत. . . गाडया - घोडयांवरनं ! माल सांग आक्क्ये आपल्याला कसं पर्वडायचं आस्लं म्हागडं स्वांग.
तुला आदूगर माझ्या कामाबद्दल सांग्तो .मी पिच्चरच्या टाकीत काम कर्तो. ईढं तीन चार टाक्या येक्काच इमार्तीत आसत्यात. शहरातले सायबं दिवसा काम करत्येत आन संध्याकाळी पिच्चर पाहात्येत.आश्याच येका थेट्रात मी फूड कौंटर वर काम कर्तो . . . आरं द्येवा , तुल कसं समजंल फूड कौंटर म्हंजे काय ते ? सांग्तो.
शहरातली मान्सं .पन्नासच्या पोत्यात आनखी पंधरा ईस किलू टाकल्यावर गोनी कशी टम्मं फुगंल ना तशी यांची शरीरएसटी आसते आन मंग यांना खायला लै लागतं .काही बाप्ये तं थेट तिक्टाच्या लायनीपास्नंच हादडायला सुरु करतेत.
पिच्चर पान्यासाठी येत्येत इथं आन मंग त्ये इथल्या फूड कौंटरवर यून लाह्या ,बटाटा येफर ,समोशे आसं काय काय इकत घेत्येत.च्या कॉफी , फसफसनारी सरबतं आन आइस्क्रिम बी आस्तंया.
हाँ मातूर घेत्येत.कॉफी च्या हातानं नै बनवित.स्पेश्यल मिशीन आस्तं .बटन दाबलं का लग्गेच गर्रम कॉफी तैय्यार .आशाच येका मिशीनवर सायबानं मल काम दिलंय.
सांगायचं इसरलो तुला आक्क्ये ,इकडं पावचे लै जिन्नस मिळत्यात .बर्गर म्हंत्येत त्येला .गावाकडं आपुन कुत्र्यालमांज्राला पाव खाऊ घाल्तो पन इथली मान्संच जेवन जेवायचं सोडून पावच खात्येत.
आपला द्वास्तं बी तिथल्लाच .त्यानं माला यक नवा परकार खायला दिलता .तेच्यात मटनाची कोर्डी भाजी आस्ते.पहील्या घासालाच मी इचारलं ,“नांव काय रं ह्याचं ?”
तसा त्यो म्हनला ,“ हॉटडॉग !”
छ्या ! नांव ऐकलं आन दिलान फ्येकून मी ,म्हनलो,“गडया ,आपल्याला काय समजलास ? कुत्र्याचं मटन नै खात आपून !”
तवा मित्र समजौन समजौन पर्शान झालता की येच्यात कुत्र्याचं मटन नै फक्त नावच तस्लं इचित्रं हाय म्हणून.
तवा आपुन मानलो .काय पन नाव ठिवलंय म्हनं ‘हॉटडॉग !’
इथल्या पिच्चराच्या टाक्या फ़ुल्ल येरकंडीशन आस्तेत. येवढं थंडकी वाटतं येवढयांत आपण ढगात त नै नं पौचलो ? पन खरं सांगू आक्क्ये , माला गावाकडची लै आठवण येती.सालं इथल्या लॉकांना थंडाव्यात बसता यावं म्हणून मंडळ इज पुरवतं आन गावाकडं आपला बा गद्धा म्ह्येनत करून करून आन रगताचं पानी करून शेती पिक्वित व्हता तं तेच्या मोट्रीला मातूर इज नाय.आसा कसा हा अजब न्याय ? डॊळं भरलं बग माजं ल्हिता ल्हिता .बरं ते जौ दे ,येक गंमत सांग्तो तुला इथल्या बाजाराची.
. . . यकदा द्वास्तं माला म्हनला का ,चपला ,बुटं,कपडे,साबनी,भाजीपाला सारं येकाच दुकानात मिळतं म्हणून,मला खरंच वाटंना .
मी ईचारलं,“खरंक्काय ल्येका ? का चेष्टा करतोस माझी ,व्हय रं ?”
तसा त्यो म्हन्ला,“खरं नाय ना वाटत तुला ?येकदा संगच जौत आपन ” आन मंग ग्येलो नं आम्ही.
तिथेबी थंडी हावा.ह्ये शहरवाले दुकानदार, मान्सांना दारातंच गार करून टाकत्येत..ह्ये वारं चालू सुसाट !जातांना पोलीस व्हता दारात.आता सर्वीकडंच आस्तेत.पन काय येळ येती येकेकावर बघ ना आक्क्ये .गावाकडं पोलीसदादाला आपन रामराम करायचो .आन ह्यानं ? ह्यानं आम्हालाच सलाम ठॉकला ना !
आन मंग ग्येलो मंदी. आगा गा गा !आठवडयाचा बाजारच जसाह्यी येवढी मोठी पसरलेली दुकान . तुला सांग्तो आक्क्ये ,येका नजरंत मावंना !
इकडं ब्यॅगा मस्तं टांगलेल्या ,छत्र्या तिकडे टांगलेल्या ,पलीकड ल्हानग्यांसाठी खेळणी,तिकडे किराणा ,येका बाजूला चपला आन बुटं तं येका बाजूला मॉबाइल,कॅमरा फिमरा आशा म्हागडया इले ट्रानीक चीजा,वरच्या मजल्यावर बी साड्या ,पॉरा पॉरींचे कपडे ,काचसामान ,आत्तरं आरारारा ! कुठं कुठं बगू आन किती किती बगू आसं झाल्तं माला.
तिथे काम करना-या प्वारी प्वारांच्या डोक्यांवर लाल टोप्याआन अंगात लाल सदरे आन तशीच प्यॅंन्ट पाहून दॉस्ताला म्हनलं,“सगळे बॅंडवाले आन्ले क्काय पकडून ?” तसं त्याला बी हासू आलं.
नजर फिरवून पाहीलं सारे बाया बापडे आपल्या पॉरा सॉरांना घ्यून ट्रॉल्या घ्यून फिरत होते.
मी द्वास्ताला इचारलं ,“ द्वास्ता ,ही ट्रॉली कशापायी रं ?”
तसा त्यो म्हनला ,“आपल्याला जी वस्तू पाहीजे ती ट्रॉलीत आपण टाकायची अन तिकडे शेवटच्या बाजूला पैसे द्यायचे.”
त्याला पुढे इचारलं ,“आस्सं ? नांव काय रं ह्या दुकानाचं ?”
त्यो म्हनला,“बीगबाजार !”
आयक्लं आन जे हासू आलं माला आक्क्ये ! त्यानं कारण इचारलं.मी म्हन्लं.“आरं ,पैशे देनारे आपूनच आन तरीबी दुकानभर
भिका-यावानी स्वताच झोळीत वस्तू टाकत फिरायचं . . . हा कसला बीगबाजारल्येका ?. . . हा तर भीकबाजार !
तुला सांग्तो आक्क्ये ,इथे लईच गोष्टी येगळ्या हाईत .घोळक्यातला पॉरगा कोन्ता आन पॉरगी कोन्ती ते ऒळखूच येत नै बग .आगं का
म्हनून काय इचारती ?इथाल्ले प्वारं संकराच्या जटेवानी लांब क्येसं वाढवित्येत, वेण्या घालीतेत,आन प्वारी? त्या प्वॉरांवानी शर्ट पॅंन्डांवर फिरतेत. बहुतेक प्वारं ऊजडे चमन आस्त्येत आन प्वारी ? क्येसं येक तं छोटे कर्तील, नै तं रंगवित्येत .रंग बी आशे येकेक .
. . .सोनेरी ,चंदेरी आन काय काय .गावाकडं शेनानां जमीन सारवल्यावर रांगोळीसाठीपोरी बाळीजमीन रंगवायला वापर्तेत तसा गेरूचा रंगबी ह्ये लोक यांची टकूरी रंगवायला वापर्तेत,आत्ता बोल.
पन ह्या क्येसांच्या रंगापायी माझा लय गोंधूळ होतूय.
कॉफी घ्यायला येना-या गि-हायकांमधी म्हतारी दिसती म्हून ‘मावशी’ म्हनावं तं ती तरनी निघती आन ’ताई‘ म्हनलं तर ती माय येवढी आस्ती. इथल्या बायाबी साडया नै घालत.त्या घालत्यात पंजाबी डरेस आन त्यांना वाटतं ‘म्येरी त्वचा से मेरी उम्रं का पत्त्ताच्य नै च्यलता.’
काही प्वॉरींना वाटतं , सोनेरी रंग क्येसांना लावला तं आपन लै भारी दिसू .पन आक्क्ये क्येसांचा रंग बदलला म्हनून आंगाचा थोडाच बदल्ता येतो ?
आंगाचा कलर आस्सा काळा .पक्की ग्यारंटी . . . धुतला तरी जानार नै .कलर ग्येला तं पैसे वापस.तं आशा प्वॉरींनी क्येसं रंगवल्यावर ,माल्सांग ,त्या च्येटकिनी नाय दिसनार तं काय दिस्तील ?
इथल्या रस्त्यारस्त्यांवरून पायी नै तं गाडयांवर फिरनारी ‘यक दुज्ये क्ये लिये’ जोडपी दिस्त्यात.तुला सांगतो आक्क्ये,गाडीवरून जातांना ही प्वारी प्वारं आपल्या मुस्कटांना फडकी आश्शी गुंडाळत्येत का त्येंचा बा बी नै वळखू शकत त्येंना या आसल्या ‘स्पैडरमन’ रुपात.
तुला सांग्तो आक्क्ये , इथल्या भवान्या दुचाकीवर डबल शीट बसतांना येवढं चिटकू - चिटकू बसत्यांत का जसं काय आनिक एक मानूस तिथं बसायचा हाय.मी म्हंतो - जरा मोकळं ढाकळं बसायचं ना रे गडयानहो .काय सांगू ? आश्या नमुन्यांकडं पाहील्यावर माझी मालाच लाज वाटती.
इथल्या प्वॉरा प्वॉरींची नावं बी येगळीच ! . . . आता काय ,सर्वेच शिरीयली पाहात्येत मग प्वॉरींचीनावं . . . ‘शिवानी’,‘शिबा’,‘शिना’,‘शिखा’, आरारारा !ऐकलं तवा वाटलं - यांच्या बापांना ‘शी’ शिवाय दुसरी कोन्ती चांगली सुर्वात नाय का सुचली . . . नावासाठी ?
प्वॉरांची नावं कुत्र्या-मांजराला देत्यात तशी आसत्यात ‘बॉबी’,‘रॉकी’,‘व्यंकी’,‘पॅडी’,‘मॅंडी’,‘व्हीटो’,‘मिंटॊ’, वगैरे.
साराच येडयांचा बाजार !
आक्क्ये , याच्यापेक्षा आपलं गांव बरं .आजून तरी तिथं लाज बीज,मान मरयादा टिकवून हौत आपन.
थेटरात काम कर्तो तं थोडा थोडा पिच्चर मधनं मधनं पाह्यला मिळतो .पन आक्क्ये ,ह्याआत्ताच्या पिच्चरांमंदी काय दम -हायला नै बग आत्ताच्या . . . !
आर्ध्या हिंदी पिच्चरांचे नावं इंग्रजीतनं आसत्यात आन पाहावं तरी काय तेच्यात ? झुरळं -मुंग्या मारावी तशी शिन्मातली मान्सं मान्सांना मारून टाकत्येत आन नंतर गानंबी काय ? तं ‘ये गन्पत ,च्यल दारू ला ’ .हात्तिच्यामा ऽ ऽ ऽ ऽ री.
यकदा काय झालं .नुक्तीच लग्नं झालेली येक माहामाया कॉफी घ्यायला आली .मी दिली , बाकीचं पैसं परत क्येलं .तरी बया जागची हालंच ना .बाकीच्यांना बी सर्व्ह करायचं व्हतं,मी तिला तसं सांगीतलं .तं म्हन्ली ,“मॉन्टी उचलेल ना !”
आपल्याल वाटलं मॉन्टी तिचा हरकाम्या नोकर आसंल. आन आसंल. कुठेतरी आन त्योच यून उचिलतोक्काय कॉफीचे मग.
तरीपन खात्रीसाठीमी इचारलं ,“म्यॅडम ,हा मॉन्टी कोन ?”
त्यावर ती म्हनली ,“नव्रा आय माझा !”
बग आक्क्ये बग ! नव-यालाबी कशा वागवतात इथल्या बायका !
लईच झाल्या शहराकडच्यांच्या कुचाळक्या .तुझ्या बद्दल इचारलंच नै.
कशी हैस तू ? . तब्येतीला जप.जास दगदग नकू करत जौ .रघू साळंत जायला लागला आसंल. पुढच्या येळला त्येच्यासाठी मस्तं मंकी वाश जीन घेऊन यील.पाव्हनं काय म्हनत्येत.
माय आन बा ची तब्येत काय म्हनती .मायला सांग का तिच्या दुखना-या गुडघ्यांसाठी येक पट्टी हिकडं मिळते . . .नी कॅप , पुढच्या येळला घेउन यीन.बा ला बिडी कमी पे म्हनून सांग .लै खोकल्तो त्वा.येत्या सोम्मारी पयला पगार व्हईल ,तवा लगंच पोस्टानी मनी ऑर्डर करंल सांग त्येन्ला.
माझी काळजी करू नगंस .तुमची खुशाली कळीव .पत्र लिही.

तुझा लाडका भौ,
शिरपत.

पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

॥ फटका ॥

॥ फटका ॥
। चढता जिने तु इमारतीचे
गुटख्याच्या पिचका-यांनी रंगवू नको ।
। आले उगाच मनांत म्हणून ,
धूम्रवलये बसमध्ये सोडू नको ।
। मद्याची असे प्राणांशी गाठ ,
हातमिळवणी व्यसनांशी करू नको ।
। बाप आहेस दोन मुलांचा ,
marital status हे आपले विसरू नको ।
। पाहण्या कोवळ्या सुंदर पोरी,
उभा कट्टयावरी राहु नको ।
। भेटता एखादी सुंदर तरूणी ,
फंदात फारसे पडू नको ।
। निभव चांगला ग्रुहस्थमासि,
पत्नीस धोका देऊ नको ।
। जाता मनोरंजनासि मल्टीप्लेक्समध्ये,
मराठी चित्रपट टाळू नको ।
। तिकीट काढूनि शंभराचे ,
पार्कींगचे रूपये पाच बुडवू नको ।
। खरेदीस जाता मॉल मध्ये ,
वायफळ खर्च तू करू नको ।
। जाता पैसे उगाच वाया तुझ्या अविवेकामुळे ,
भाजीत घासाघीस रुपयाची करू नको ।
। नियमभंग होता रहदारीत ,
दंड भराया कचरू नको ।
। राहू दे पावती ,घे पन्नासाची पट्टी ,
म्हणोनी पोलीसास अविचार करू नको ।
। पैसे भरपूर हवेत अजूनि ,
म्हणून आमंत्रण भ्रष्टाचारा देऊ नको ।
। गांवयांस प्रबोधनासाठी ‘पराग छंदी‘चे फटके
मागे पुढे तू पाहू नको ।

पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit me @: www.hasyakavitaa.blogspot.com

" धाव रे चोरा ! "

लोडशेडींगमुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे.अंधाराचा फायदा चोर घेतात व पळून जातात ,यावर आमची कवीता आहे.
(चाल: नाच रे मोरा)
धाव रे चोरा ,अंधाराचा फायदा घेऊन ,
धाव रे चोरा धाव ! ॥ध्रु॥

लोकांचे पैसे लुटतोस रे,
पापांचा घडा भरतोस रे,
लागताच चाहूल ,
सहज देतोस हूल,
कसा पळतोस असा ,जरा थां ऽ ऽ ब !
धाव रे चोरा . . अंधाराचा . . . ॥१॥

अंधाराचि साथ तुला मिळली रे,
लोडशेडींगमुळे सुसंधी लाभली रे,
आम्ही कमावणार ,
मात्र तुझ्यामुळे गमावणार,
वस्तू ,कपडे अन कॅ ऽ ऽ श !
धाव रे चोरा . . अंधाराचा . . . ॥२॥पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

(चारोळया )

(चारोळया )

‘पुष्प-प्रदर्शन ’
सौंदर्य फुलांचं साठवावं डोळ्यांत अन भरून घ्यावं मनात,
पण मोबाईल पिढी आजची ,
‘सेव्ह’ करायचा प्रयत्न करते ‘क्लिक क्लिक’ करत,
आपापल्या बोळ्क्या मोबाईल - कॅमेरात !

‘विरोधाभास’
फुटकी काच अशुभ ,असं लोक म्हणतात ,
पण फुटक्या रंगी-बेरंगी काचा ,
पुन्हा पुन्हा बघता याव्या म्हणून,
कॅलिडोस्कोप मात्र जवळ बाळगतात.

`गणितं’
बाकीच्यांना लक्षात येत नाहीत ,
पण मला मात्र तुझ्या चेहऱ्यावरचे भाव कळतात,
सुटता सुटत नाहीत अशी गणितं,
मला मात्र सोडवायला आवडतात.

‘नाटक’
मला नाही जमत ,
तसं दुट्टपी वागणं ,
तू आवडत असूनही ,
काहीच वाटत नाही ,असं तुला दाखवणं !

‘बुद्धी’
आजकालच्या मुलांची डोकी,
असतात ‘सुपर फाईन’,
बोट घातलं असतं तोंडात त्यांना पाहून ,
जर असता आज आईनस्टाइन !
पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in visit my site: http://www.hasyakavitaa.blogspot.com/

" बोका "

एकदा टॉम आणि जेरी जोडीने ‘मर्डर’ पिक्चर पाहायला गेले.पॉपकॉर्न खाण्यावरून त्यांचं भांडण झालं. टॉम बिळात लपला व समुहातल्या बाकी उंदरांना तो जेरी बद्दल सांगू लागला . . . . .

(चाल :दिल को हजार बार रोका . . . )

हो ऽ ऽ हा हा हा ऽ ऽ , हो ऽ ऽ हा हा हा ऽ ऽ,
बिळाच्या तोंडापाशी ऽ ऽ आला आहे बोका ,
पटकन जाऊन कोणीतरी त्याला ठोका,
जीव हा वाचवा ,
बोक्याला कटवा,
नाही ऽ ऽ तर होईल प्राणांशी तुमच्या धो ऽ ऽ का ! ॥१॥

आ ऽ ऽ ऽ आ ऽ ऽ ऽ ,
वाचवा याच्यापासून स्वत:ला ,
खेळतो हा गनिमी कावा ऽ ऽ ,
कोणितरी त्याच्या दुधाच्या वाटीत ,विष घा ऽ ऽ लून ठेवा !
बिळाच्या तोंडापाशी ऽ ऽ आला आहे बोका . ॥२॥
पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com