‘शोले ’ ( शरद उपाध्येंच्या व्याख्यानातून ….! )
२०१०साली महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अचानक ‘ज्योतीषशास्त्र ’ हा विषय समाविष्ट केला गेला.काही विद्यार्थ्यांना तो समजत नसल्याने विशेष व्याख्यानासाठी खुदद् ज्योतिषाचार्य शरद उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आले.
आता मुलांना हा विषय सोप्या पद्धतीने शिकवणे हे आव्हान त्यांच्यापुढे होते.त्यांनी विचार केला की ,मुलांचा आवडता विषय ‘चित्रपट’.एखाद्या चित्रपटातून आपल्याला ज्योतीष समजावता येईल का ?
त्यांनी उपस्थितांना विचारले ,“मुलांनो तुम्ही ‘शोले’ पाह्यलाय का ?”
विद्यार्थी: “कुठला ? जुना की रामगोपाल वर्माचा ?”
ज्योतिषाचार्य:“ जुना .”
विद्यार्थी :‘हो ’ .
ज्योतिषाचार्य:“ ऐका तर मग.मी त्या आधारे तुम्हाला हा विषय समजावणार आहे.” अश्या पद्धतीने त्यांनी व्याख्यानाला सुरूवात केली.थोडे जोक्स्,थोडं ज्योतीष,थोडे पौराणिक दाखले देऊन त्यांनी व्याख्यान रंगवले.
“ सर्वांना शरद उपाध्येचा नमस्कार !
थोडी प्रस्तावना करतो.मुळात का ऽ ऽ य की एका छोट्याशा गावा ऽऽ त ही गोष्ट घडते. . . रामगढ ! तिथले लोक शेती ,माळीकाम अन् मोलमजुरी करणारे ! अन् वेळ मिळाला ऽ ऽ तर एकत्र येऊन ऽ ऽ होळी खेळणारे !पोलीस इन्स्पेक्टर ठाकूरभोवती ऽ ऽ कथा फिरते.त्याचं . . . . पत्नी,भाऊ,बहीण,मुलगा,सुन,नातू असं मोठं कुटुंब ! हो ऽ ऽ तं का ऽ ऽ य की हा ‘गब्बरसिंग’ नावाच्या फे ऽ ऽ मस् डाकूला अटक करतो अन् तिथून सगळ्या सूडनाट्याची सुरूवात होते तोच हा शोले !
आता आपण ऽ ऽ या दोघांच्या कुंडल्या बघू . . .
गब्बर – हा कुंभ राशीचा . ही राशीचक्रातील संचयी रास! कुंभ म्हणजे मडके.मला आठवते. . . . लहानपणी पाणी भरतांना ,मडके कधीच काठोकाठ भरले नाही. जरा विचार करा ऽ ऽ.गाववाल्यांकडनं नेलेल्या धान्याचं त्यानं काय केलं ? कधी पार्टी केली की कधी दरोडेखोरांचं ‘गेट टुगेदर’ केलं ,असं झालंच नाही.
आता आपण ऽ ऽ ठाकूरची रास बघू. . . ठाकूर - हा सिंह राशीचा.
मुळातंच राजेशाही लोकांची ही रास ! सिंहाकडे बघा. . .अगदी म्हातारा किंवा जखमी असला तरी तो जंगलाचा राजा असतॊ,हे आपल्याला दोन्ही हात गमावलेल्या ठाकूरच्या गब्बरशी बाणेदारपणे बोलण्यावरून सहज लक्षात येतं. अरे इथे पेंशन मिळायची मारामार पण तो म्हणतो,“जब तक जियूंगा सर उठा के जियूंगा !”. काय तो बाणेदारपणा ! काय ती करारीवृत्ती !
या दोघांच्याकडे कुंडलीप्रमाणे पहाता असे लक्षात येतं की या दोन्ही ऽ ऽ शत्रुराशी ! अन् थोडा थोडका नाही तर साक्षाऽऽ त् मृत्यूषडाष्टकयोग ! म्हणजे पुढे ऽ ऽ या दोघांपैकी एक नक्की खपणार आहे हे लक्षात येतं ”
गब्बरने आपल्या कुटुंबियांना मारलेलं पाहून ठाकूर तडक सूड उगवायला निघतो.इथे आपण सिंह राशीची वैशिष्ट्यं समजावून घेऊ. सिंह ही अत्यंत तापट रास !
असं म्हणतात की ,मीन हे शरदातलं शीतल चांदणं अन् सिंह हे मध्यान्हीचे प्रखर ऊन !
सिंह राशीच्या व्यक्ती भडक डोक्याचे असतात ,यांनी आपल्या रागावर नियंत्रण हे ठेवलेच पाहीजे .
विष्णूपुराण जर तुम्ही वाचलं असेल तर त्यांत एक सुंदर श्लोक पंधराव्या अध्यायात दिला आहे की,“ क्रोधं वर्जम् सज्जना: ”
कारण क्रोधात केलेली कोणतीही कृती आपला नाश ओढवून घेणारी असते.
तसंच ठाकूरचं झालं . . .
अनावर संतापामुळे संकटात त्याने डोळे झाकून उडी मारली .गब्बरला पकडायला साधा कॉन्स्टेबलही बरोबर नेला नाही.याचा परिणाम ह्यायचा तोच झाला. . . गब्बरला तो आयताच सापडला अन् त्याचे दोन्ही हात गब्बरसिंहाच्या माणसांकरवी चरवीतून ऊस कापावा तसे पट्टकन कापले गेले.इतकं भयंकर दृष्य आहे ते की वाटतं अगदी वै-यावरही असा ऽ ऽ प्रसंग येऊ नये.
मगर गब्बरचा सूड पुर्ण करन्यासाठी ठाकूर जय-वीरूला बोलावतॊ.हे दोघे भुरटे चोर यांच्या कुंडल्याही गमतीशीर आहेत त्या आपण पाहू.
जय . . . . हा मकर राशीचा . राशीचक्रातली ही आळशी रास !
इथे एक उदाहरण देतो की वीरू बसंतीला जेव्हा नेम धरायला शिकवत असतो तेव्हा दूर झाडाखाली हा जय झोपलेला असतो आणि तरीही इतक्या दुरून ऽ ऽ ऽ जवळजवळ फर्लांगभर लांबून तो नेम कसा लावू शकला ? याचं कारण म्हणजे आळशी असले तरी मकर राशीचे लोक प्रगती करतात.या मकर राशीच्या लोकांमध्ये स्वभावत:च आळस असतो.
मगर पहा . . . . पाण्यात कशी सु ऽ ऽ स्त पडून असते.पुढे हा जय ठाकूरच्या सुनेवर लाईन मारतो पण मनातलं तिला सांगत मत्र नाही याचंही कारण आळसंच !
आता वीरूची रास पाहू. . . वीरू हा वृषभ राशीचा !
चित्रपटाच्या शेवटी वीरूच्या लक्षात येतं की जयनं आपल्याला एकाच छापाचं नाणं पिक्चरभर दाखवून फसवलंय पण ते तसं नाहीये कारण त्याने ते नाणं कधी स्वत: चेकच केलं नाही.अशी दुस-यावर गाढ विश्वास ठेवणारी माणसं म्हणजे वृषभ !
काठी टोचल्याशिवाय बैल जसा स्वत:च्या बुद्धीने एक इंचही पुढे सरकत नाही तसे हे लोक असतात.
वीरू जयचंच शेवटपर्यंत ऐकतो.
स्वत:ची बुद्धीच कधी त्याने वापरली नाही की अरे, नेहमी छापाच कसा येतॊय ? यात काही गोलमाल तर नाही ना ? अशी साधी शंकाही वीरूला तीनतासात एकदाही आलेली नाही.
यानंतर आपण काही विनोदी अन गंभीर पात्रं पाहू. . . .
बसंतीची मौसीची रास मिथुन.या मिथुन राशीचं वैशिष्ट्यं म्हणजे हे लोक नाटक करायला वस्ताद असतात.
वीरू अन बसंतीच्या लग्नाला ही मौसी त्यांच्या प्रेमप्रकरणाची चांगली गांवभर बोंब झाल्यावर संमती देते
मग आधी का नाही देत ? याला कारण तुमची रास ! तुम्ही कसे असता ,ते तुमच्या राशीवर अवलंबून असते.
सुरमा भोपाली. . . . हा गावचा लाकूड व्यापारी ! जय-वीरूला तुरुंगात पाठवतॊ तो हाच . . . याची रास मेष ! ही मुलत:च द्विस्वभाव रास म्हणून तर जय-वीरूच्या पश्चात तो त्यांची टवाळी करतो अन ते समोर येताच हा बहाद्दर त्यांच्या पाया पडतो.
मेषेच्या व्यक्तींबद्दल एक लक्षात ठेवावं की हा मेंढा आहे.एकतर तो ढुशीतरी देनार नाहीतर शिंग तरी खुपसणार !
Accidents च्या केसेस चेक केल्यात तर बहुतेक accident हे मेषेच्या व्यक्तींमुळे होतात हे लक्षात येईल.
आता आपण रहीमचाचांची रास अभ्यासूया . . . . .
हे मारल्या गेलेल्या अन्वरचे वडील .तुळ राशीचे .तुळ ही थोडी भावूक तर थोडी व्यवहारी रास आहे.हे लोक अत्यंत निष्पक्ष अन न्यायप्रिय लोक असतात.जय-वीरूला गावात आणल्यानेच अन्वर ठार झाला तरी त्यांना गावाबाहेर काढून द्यायला रहीमचाचा मुळीच तयार नाहीत.कारण जय बरोबर वीरू अन वीरू मागे बसंती जाणार अन मग नमाजला जातांना कधी मधी तिने हात पकडल्यावर म्हाता-याची जी थोडी फार enjoyment व्हायची ती बंद नाही का होणार ?
या राशीबद्दल एक सांगता येईल . . . . संस्कृतात एक श्लोक आहे “न कदाचिनं जायन्ते शीतांशो: उष्णरश्मंय” .चंद्रापासून कधीही उष्ण किरण उत्पन्न होत नाहीत तसा सज्जनांपासून कोणालाही त्रास होईल असे ते वागत नाहीत आणि म्हणून “कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेचि कदाचितं” अशी त्यांची वृत्ती असते. हे झालं भाऊकपणातुन पण या राशीची व्यवहारी बाजू कोणती ?त्यांना का नाही जोश आला गांववाल्यांसारखा ? जय-वीरूला गावातून “जा” म्हणायला,कोणाच्या बापाचं काय गेलं असतं ? पण हे जर दोघे निघून जातील तर बसंतीही वीरूबरोबर जाईल मग अन्वर तर आधीच खपलाय आता रहीमचाचांना नमाजसाठी दर्ग्यापर्यंत कोण सॊडेल ? तर बसंती ! ती जायला नकॊ म्हणून त्यांनी जय-वीरूला गावाबाहेर जायला आक्षेप घेतला.अशी विलक्षण सद्सदविवेकबुद्धी तुळवाल्यांकडे असते.
आता आपण सांबाची कुंडली बघू . . . हा गब्बरचा शार्पशूटर !
नेहमी खांद्यावर बंदुकीचा बेल्ट अडकवलाय. कुठेतरी बंदुकीनं निशाणा धरलाय.असा तो आपल्याला दिसतो यावरून लगेच लक्षात येतं की हा धनू राशीचा !
ही माणसं टोकाची संयमी असतात.याचं एक सुंदरसं उदाहरण देतो.गब्बरने strict instruction दिली असल्याने बसंती नाचून तिचं गाणं होईपर्यंत हा अगदी तस्साच चाप ओढून उभा आहे.तो बंदूक खाली ठेवतही नाही अन गोळीही सुटू देत नाही,अशी परकोटीची संयमी माणसं म्हणजे धनू रास !
असं का व्हावं ?
इतका वेळ हात असाच ठेवला तर किती दुखेल ? मग अमृतांजन लावावं लागेल .तिथे रामगढावर कोण आहे सगळ्या डाकूंमध्ये सांबाला बाम लावून देणारं कुणी नाही तरीही ह्या राशीची लोकं आपला संयम कायम राखतात.
आता आपण जेलरची रास पाहू . . . .
हा अंग्रेजोके जमानेका जेलर कन्या राशीचा ! या राशीची माणसं भित्रट असतात.
मलये अपि स्थितो,वेणू ऽ ऽ वेणू ऽ ऽ एव न चंदन !
सिंहाची कातडी परिधान केली तरी तरसाला काही त्याच्यासारखं लढता येणार नाही.म्हणून साधी नळी दाखवून जय-वीरू तुरूंगातून फरार होऊ शकले.
आता गब्बरची रास बघू . . . .
गब्बरनं अन्वरसारख्या निरपराध तरूणाला का मारावं ?
त्यानं ठाकूरलाही पुरतं मारलेलं नाहीये . . . गाववाल्यांनाही तो छळतोय.पोलीसांपासून दूर पळतोय.
हा गब्बरसिंग असा का वागावा बरं ?
कारण त्याच्या राशीत आहे . . .वृषभेचा शनी वक्री असतांना जर चंद्र बाराव्या स्थानी आला तर अशी विपरीत बुद्धी होणारंच !
त्यांत शेवटी तो बसंतीलाही पळवून आणतो. मुळात काय ?
आधीच तो मर्कट , त्यात चक्रम, मग मद्यही प्याला अन घोटाळा झाला – तसला हा प्रकार !
गब्बर जयला ठार मारवतो याला कारण “ विनाशकाले विपरीत बुद्धी ! ”
चित्रपटाच्या शेवटी ठाकूर गब्बरला मारून न टाकता “ कानून के हवाले ” का करतो हे या छोट्याशा ओवीवरनं लक्षात येईल. “ दिधले दु:ख पराने ,फेडू नयेचि सोसावे ,
शिक्षा दैव तयाला करील म्हणोनी उगाचि बैसावे !”
म्हणजे काय ? जी शिक्षा करावयाची ती देवच करील हा शहाणपणा तापट सिंह राशीच्या ठाकूरला तीन तासांची कहाणी घडून गेल्यावर सुचला आहे. अश्याप्रकारे या कहाणीचा सुखांत आपल्याला पहायला मिळतो.
पराग खैरनार,नाशिक मोबाईल क्र. 8698 390822
E-mail ID: paragkhairnar@gmail.com
visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com
No comments:
Post a Comment